वाढत्या वयासह ह्रदयविकाराचा धोकाही वाढत जातो. खाण्यातील बदल, चुकीची जीवनशैली, वाढलेलं वय, तणाव अशी कारणं यासाठी कारणीभूत असतात. देशात गेल्या काही महिन्यात अनेकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. पण सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. अनेक तरुण कमी वयातच हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमावत आहेत. कधी व्यायाम करताना, तर कधी खेळताना तरुणांना ह्रदयविकाराचा झटका येत आहे. त्यातच आता गुजरातमधील (Gujarat) अरावली येथील एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 20 वर्षाच्या तरुणाचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीच्या मोडासामधील दीपक्षेत्र येथील गोवर्धन सोसायटीच्या तीर्थ अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहतं. कुटुंबातील 20 वर्षीय पर्व सोनी क्रिकेट खेळतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पर्व इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. पर्वच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच रडून रडून त्यांची स्थिती वाईट झाली आहे. 


दोन दिवसांपूर्वी सुरेंद्र नगरच्या पाटडीमध्ये शहराचे भाजपा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजूभाई ठाकोर यांचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. राजूभाई ठाकोर मित्रांशी बोलल्यानंतर रात्री उशिरा घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांच्या हातात वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळे ते दुचाकीने औषध आणण्यासाठी सरकारी रुग्णालयात पोहोचले. पण रुग्णालयाच्या बाहेरच ते कोसळले आणि मृत्यू झाला. अशाच प्रकारे राजकोटमध्ये एक 50 वर्षीय महिलेच्या मुलाचा लग्नाच्या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 


तेलंगणाच्या नांदेडमध्ये एका तरुणाचा डान्स करताना अचानक मृत्यू झाला होता. 25 फेब्रुवारीला ही घटना घडली होती. मुलगा फक्त 19 वर्षांचा होता. तेलंगणात एका आठवड्यात हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची ही चौथी घटना होती. याआधी 22 फेब्रुवारीला हैदराबादच्या जीममध्ये वर्कआऊट करताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. 


हैदराबाद येथे 20 फेब्रुवारी एका लग्न सोहळ्यात नवरदेवाला हळद लावत असतानाच एक व्यक्ती अचानक खाली कोसळली आणि जागेवरच निधन झालं. तेलंगणात गेल्या शुक्रवारी एक व्यक्ती चालता चालता खाली कोसळला होता. पण तिथे उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सीपीआर देत त्याचा जीव वाचवला होता. 


दरम्यान, त्याआधी गुजरातच्या अहमदाबाद येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान जीएसटी कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ही सामना जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीच्या कर्मचाऱ्यांदरम्यान होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये एका महिन्यात सात लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.