मुंबई : लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. पुढचा धोका ओळखून जागरूक राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून तशा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ब्रिटनहून (Britain) परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह (Corona positive) नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रविवारपासून ब्रिटनहून तब्बल ५९१ जण परतले आहेत. मात्र आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळलेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतील १८७ आणि  राज्यातील १६७ तर परराज्यातल्या २३६ प्रवाशांचा समावेश आहे. यातील २९९ जणांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर राज्यांतील प्रवासी दुसऱ्या विमानाने आपापल्या राज्यात परतले आहेत.


 ब्रिटनहून भारतात आलेल्यांपैकी २० पॉझिटिव्ह 


दरम्यान, ब्रिटनहून भारतात रविवारपासून परतलेले तब्बल २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये थैमान घातलेल्या नव्या कोरोनाची दहशत भारतातही पसरली आहे. लंडनहून दिल्लीत परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. त्यापाठोपाठ अमृतसरमध्ये आठ जण, अहमदाबादेत पाच जण तर चेन्नईत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे ब्रिटनहून परतेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.


या सर्वांना नेमक्या कोणत्या कोरोनाची लागण झालीय याची चाचपणी सुरू आहे. या सर्वांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनहून परतलेल्या सगळ्याच प्रवाशांची आता कोरोना टेस्ट होणार आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा संवाद


ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची दहशत जगभरात पसरलेली असताना राज्यातही भीतीचं सावट पसरलंय. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सावध राहण्याचे आदेश दिलेयत. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.