जयपूर : राजस्थानात रात्री आलेल्या धुळीच्या वादळामुळे तब्बल २७ जणांचा मृत्यू झालाय तर १००हून अधिक लोक जखमी झालेत. या वादळाची तीव्रता इतकी होती की यामुळे अनेक झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक घरे जमीनदोस्त झाली. राजस्थानच्या भरतपूर येथे १२ जणांना या वादळामुळे जीव गमवावा लागला तर ढोलपूर येथे १० आणि अलवारमध्ये ५ जण मृत्युमुखी पडलेत. या वादळाचा फटका राजस्थानातील तीन जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव हेमंत कुमार यांनी दिली. ढोलपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोघे उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील रहिवासी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादळात १००हून अधिक जण जखमी झालेत. अल्वारमध्ये २० जण, भरतपूर येथे ३२ तर ढोलपूरमध्ये ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्यांपैकी काही जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत तर काहींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलेय. ढोलपूरमध्ये एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. 


या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर ६० टक्के जखमींना २ लाख आणि ४० ते ५० टक्के जखमींना ६० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून लोकांना हरप्रकारे मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिलेय.


काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेमुळे आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनही रद्द केले. त्यांनी ट्विटरवरुन या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला. रक्तदान शिबीर तसेच जनहित कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती गेहलोत यांनी दिलीये.