नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्यानंतर मणिपूर आणि आसामचा नंबर लागतो.  दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान झाले.


कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झाले. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान झाले.



दरम्यान, भाजपकडे सध्या २७ जागा असून, या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यातील दहापैकी आठ जागा युती तर दोन जागा आघाडीकडे आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.


तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे.