भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. १२ दिवसांत पक्षाच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे आमदार नारायण पटेल यांनी खंडवा जिल्ह्यातील मांधाता विधानसभेतून आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी स्वीकारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी काँग्रेसचे आमदार प्रद्युम्न लोधी आणि सावित्री देवी कासडेकर यांनीही राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सावित्रीदेवी यांनी राजीनामा दिल्यानंतर परिवहन मंत्री गोविंदसिंग राजपूत म्हणाले होते की, आणखी आमदार काँग्रेस सोडतील.


10 मार्च रोजी मध्य प्रदेशातील 22 काँग्रेस आमदारांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि शेवटी अल्पमतात आलेले तत्कालीन कमलनाथ सरकार पडले होते. यानंतर 12 जुलै रोजी बडा मलहारा येथील काँग्रेसचे आमदार प्रद्युम्नसिंह लोधी आणि 17 जुलै रोजी नेपानगरचे काँग्रेसचे आमदार सुमित्रा देवी कासडेकर यांनीही राजीनामा दिला होता. 23 जुलैला मांधाताच्या आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.


या 3 आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसकडे 89 आमदार आहेत. तर 230 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे 107 आमदार आहेत. इतर पक्षाचे व अपक्ष 7 आहेत तर 27 जागा रिक्त आहेत. पोटनिवडणूक होत असलेल्या 27 जागांपैकी दोन जागा आमदारांच्या मृत्यूमुळे रिक्त झाल्या, तर 25 जागा या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्या आहेत.