3 People Shoot Crime: बिहारमधील वैशाली जिल्ह्यामधील अमृतपूर गावामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घराबाहेर फटाके फोडण्यावरुन झाल्ल्या वादातून तिघांवर गोळीबार करण्यात आला आहे. घराबाहेर फटाके फोडू नका असं सांगितल्याने झालेल्या वादातून काहीजणांनी गावतील तिघांवर गोळीबार करुन त्यांना गंभीर जखमी केलं आहे. तिन्ही जखमी व्यक्तींना उपचार करण्यासाठी हाजीपूर येथील रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी या तिघांना दाखल करुन घेत प्राथमोपचार केल्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमृतपूर गावामध्ये हा सगळा प्रकार घडला. येथे राहणाऱ्या राय कुटुंबातील सदस्य छठ पूजेच्या तिसऱ्या दिवशी मावळच्या सूर्याला अर्घ्य दान करुन घरी येत होते. घरी आल्यानंतर राय कुटुंबातील लोक फटाके फोडत होते. त्यावेळेस शेजाऱ्यांनी त्यांना फटाके फोडण्यास नकार दिला. मात्र राय कुटुंबाने फटाके फोडणं थांबवलं नाही तर शेजाऱ्यांनी गेटवर चढून शिव्या दिल्या. प्रकरण एवढ्या पुढे गेलं की गोळीबारामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले.


घटनास्थळावरुन काढला पळ


गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. या वादामध्ये जवळपास अर्धा डझन गोळ्या झाडण्यात आला. जखमींना नातेवाईकांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र स्थानिक डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर जखमींना जिल्ह्याच्या ठिकाणी हलवण्यात आलं.


कोणाच्या पायाला तर कोणाला छातीत लागली गोळी


जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये 35 वर्षीय प्र्मोद राय यांचाही समावेश असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. 70 वर्षीय प्रदीप राय यांच्या छातीत गोळी लागली असून 30 वर्षीय मुकेश कुमारलाही गोळी लागली आहे. मुकेशच्या हाताला गोळी लागली आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही. 


आरोपींचा शोध सुरु


या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु केली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केल्या असून मोबाईल फोन लोकेशन आणि इतर तांत्रिक डेटाच्या आधारेही आरोपींचा शोध सुरु आहे. इतर पोलीस स्टेशनमधील पोलिसांचीही यासाठी मदत घेतली जात आहे.