मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक
Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी जमावाने मारहाण केल्यानंतर 12 जणांना अटक करण्यात आली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात साधू अपहरणकर्ते असल्याचा स्थानिकांना संशय आल्याने स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.
Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये साधूंवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये, उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन साधू आणि त्यांच्या साथीदारांवर तिथल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. यासोबत लोकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. साधू आणि त्यांच्या दोन मुलांसोबत असलेल्या एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. गंगासागरला जात असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुरुलियाच्या काशीपूर गौरांगडीह गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन साधू उत्तर प्रदेशातून वाहन भाड्याने घेऊन गंगासागर जत्रेला जात होते. हे साधू काशीपूरला पोहोचले आणि गंगासागर जत्रेचा रस्ता विचारत असताना परिसरातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली आणि त्यांना मारहाणही केली. त्यानंतर काशीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या लोकांची सुटका करून त्यांना सोबत पोलीस ठाण्यात नेले.
साधूंनी तीन किशोरवयीन मुलींना रस्त्याबद्दल विचारले होते. यानंतर त्यांनी आरडाओरडा करून तेथून पळ काढला. हे पाहून स्थानिक लोकांनी साधूंना पकडून मारहाण केली. जमावाने साधूंच्या वाहनाची तोडफोड देखील केली. प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून साधूंना वाचवले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना काशीपूर पोलीस ठाण्यात आणलं. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधू रस्ता विसरले होते त्यामुळे त्यांनी मुलींकडे चौकशी केली. मुली घाबरल्या आणि पळून गेल्या, त्यामुळे साधूंनी मुलींचा छळ केला असावा असा स्थानिकांचा अंदाज होता. त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी नंतर साधूंना गंगासागर जत्रेत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करुन दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
"तीन संत एका वाहनातून जात होते. त्यावेळी गौरांगडीहजवळ, तीन मुली एका तिथून जात होत्या. त्यावेळी गाडी त्यांच्या जवळ थांबली आणि साधूंनी त्यांना काहीतरी विचारले. काही भाषेच्या प्रश्नामुळे काही गैरसमज झाले आणि मुलींना वाटले की साधू त्यांच्या मागे लागले आहेत. त्यानंतर स्थानिक लोक आले आणि साधूंना दुर्गा मंदिराजवळ घेऊन गेले आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. साधूंना मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी साधूंना सर्वतोपरी सहकार्य केले. एका साधूच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे," अशी माहिती पुरुलियाचे पोलीस अधीक्षक, अविजित बॅनर्जी यांनी दिली.