गुजरातमध्ये एटीएममधून ३ जवानांना कोरोनाचा संसर्ग
एटीएममध्ये पैसे काढताना सावधान...
वडोदरा : गुजरातच्या वडोदरामध्ये ३ जवानांना कोरोना झाला आहे. या सैनिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या जवानांनी एकाच एटीएममधून पैसे काढले होते. त्यामुळे एटीएममधूनच तिघांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या जवानांनी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाने या लोकांना क्वारंटाईन केलं असून आता प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही ठिकाणी स्पर्श करताना सावध असलं पाहिजे. एटीएममध्ये हजारो लोकं पैसे काढण्यासाठी येत असतात त्यामुळे एटीएमला बटन दाबतांना हँडग्लोव्जचा वापर केला पाहिजे.
देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोलीस, सुरक्षा दल तसेच तिन्ही दलांमध्ये देखील कोरोनाचं संक्रमन होत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात नौदलाच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाउन असूनही, संक्रमणाचा प्रसार थांबलेला नाही. देशातील कोरोना संक्रमणाचा आकडा 21 हजार 700 वर पोहोचला आहे. या प्राणघातक आजारामुळे आतापर्यंत 686 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 325 लोक बरे झाले आहेत. आरोग्य कर्मचार्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळत आहे.