अमेरिकेतील चर्चच्या जागेवर उभारणार मंदिर
व्हर्जिनियात साधारण दहा हजारच्या आसपास गुजराती लोकसंख्या आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात असणाऱ्या पोर्टसमाऊथमध्ये ३० वर्षे जुन्या चर्चच्या जागी स्वामीनारायणन मंदिर उभारले जाणार आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच या देवळात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. चर्चच्या जागी मंदिर उभारले जाण्याची ही अमेरिकेतील सहावी तर जगातील नववी घटना आहे. अहमबदाबादच्या मणीनगरस्थित स्वामीनारायणन गडी संस्थानामार्फ हे मंदिर उभारले जाणार आहे. अमेरिकेतील डेलावेअर, मेरीलँड, पेन्सिल्वेनिया आणि दक्षिण न्यू जर्सीमध्ये श्री स्वामीनारायण गढी संस्थानाचे अनुयायी मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे गेल्या काही काळात कॅलिफोर्निया, लुईसविले, पेन्सिल्वेनिया, लॉस एंजालिस आणि ओहायो येथील काही चर्चचे मंदिरांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. याशिवाय लंडन आणि कॅनडामध्येही या संस्थानाकडून मंदिराची उभारणी करण्यात आल्याची माहिती भगवतप्रियादास स्वामी यांनी दिली.
पोर्टसमाऊथ येथील चर्च धार्मिक ठिकाणच असल्यामुळे ते मंदिरात रुपांतरित करताना फारसे बदल करावे लागणार नाहीत. या मंदिराच्या रुपाने व्हर्जिनियातील भक्तांना हक्काचे ठिकाण मिळणार आहे. व्हर्जिनियात साधारण दहा हजारच्या आसपास गुजराती लोकसंख्या आहे. पोर्टसमाऊथ चर्च हे पाच एकरांच्या परिसरात वसलेले आहे. १६ लाख डॉलर्स मोजून संस्थानाने हा चर्च विकत घेतल्याचे समजते. या मंदिरात भगवान स्वामीनारायण, अबजी बापाश्री यांच्यासह हनुमान आणि गणपतीची मूर्तीही असेल.