छत्तीसगडमधील बस्तर येथे सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान 36 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जवळपास 1 वाजता नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर अभुजमाडच्या थुलथुली आणि नेंदुर गावाच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात ही चकमक झाली आहे. या चकमकीत जिल्हा रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) जवान सहभागी होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन्काऊंटर करण्यात आलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह एके-47 रायफल आणि एसएलआरसह (सेल्फ लोडिंग रायफल) मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर्षी बस्तर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण 185 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये दंतेवाडा, नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे.  


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घनदाट जंगलात नलक्षलावादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. याच्या आधारे सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत कॉम्बिंग सुरु केलं होतं. त्याचवेळी नलक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर देत 28 नक्षलवाद्यांना ठार केलं. जवळपास 2 तास थोड्या थोड्या अंतराने गोळीबार होत होता. चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असून, कोणी फरार होण्यात यशस्वी झालं आहे का याची माहिती घेतली जात आहे. 


नक्षलवादाविरोधातील लढाईला हे आतापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं यश आहे. काही दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार कऱण्यात आलं होतं. त्यांच्यावर 41 लाखांचं बक्षीस होतं. यामध्ये 25 लाखांचं बक्षीस असणाऱ्या रुपेशचाही सहभाग होता. रुपेश नक्षलवाद्यांची कंपनी क्रमांक 10 चं नेतृत्व करत होता. गडचिरोलीमध्ये तो सक्रीय होता. त्याच्यावर 25 लाखांचं बक्षीस होतं. 


छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी ही एक मोठी कारवाई असल्याचं सांगितलं असून सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. "नक्षलवाद शेवटचा श्वास घेत आहे. राज्यातून नक्षलवाद नक्कीच संपुष्टात येणार आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नऊ महिन्यांत दोनदा राज्याचा दौरा केला असून मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे," असं ते म्हणाले.