केरळमध्ये पावसाचं थैमान, आतापर्यंत ३७ जणांचा बळी
केरळमधील जनजीवन विस्कळीत
तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरूच आहे. पूरस्थितीमुळे आतापर्यंत 37 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं असून जवळपास 35 हजाराहून अधिक नागरिकांना 341 शिबिरांमध्ये ठेवण्यात आलं आहे. पुराच्या तडाख्यामुळे 44 घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर 580 घरांना पुराचा फटका बसला आहे. 1300 हेक्टरवरील शेतीचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत.
राज्यातील 22 धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. नद्या, नाले धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. पाऊस सुरुच असल्याने मदत कार्यात देखील अडथळा निर्माण होत आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुन्नार येथे भूस्खलनामुळे 60 हून अधिकजण अडकले आहेत ज्यात काही परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. लष्कराच्या 8 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव कार्यासाठी हवाई दलाने 2 हेलिकॉप्टर दिली आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केरळला 10 कोटी रुपयांची मदत सामुग्री दिली आहे. आंध्र प्रदेश सरकारनेही केरळला पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. राजनाथ सिंह यांनी सर्व विभागांना वेगाने मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.