बंगळुरु : कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी जेडीएस (जनता दल सेक्युलर) च्या चार बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या आमदारांनी शुक्रवारी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं होतं.


विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा


बी झेड जमीर अहमद खान, आर अखंड श्रीनिवासमूर्ति, एन चालूवराय स्वामी आणि भीम नाईक या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के बी कोलिवाड यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.


काँग्रेस पक्षात प्रवेश?


मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही आमदार लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


एच डी कुमारस्वामी यांच्या विरोधात आमदार 


देवेगौडांचे पुत्र आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एच.डी. कुमारस्वामी हे वख्कलीगा समुदायाचं नेतृत्व करतात. मात्र, कुमारस्वामी यांच्या विरोधात सात आमदारांनी बंडखोरी केली आहे. 


पक्षावर एका व्यक्तीचा प्रभाव 


बी झेड जमीर अहमद खान यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर म्हटलं की, पक्षावर केवळ एकाच व्यक्तीचा प्रभाव वाढत आहे. एच डी कुमारस्वामी कुणाचंच ऐकत नाही. कुमारस्वामी हे आपले वडील आणि भावाचंही ऐकत नाही तर आमचं काय ऐकणार?.


जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळे आणि अपक्ष आमदारांच्या समर्थनामुळे शुक्रवारी काँग्रेसने बोनस स्वरुपात तिसरी सीटही जिंकली आहे.