नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. आता लॉकडाऊन 5.0 जून 30पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. पण या श्रमिक स्पेशल ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनपैकी 40 टक्के ट्रेन या जवळपास 8 तास उशिराने धावत असल्याचं एका रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात, गावी पोहचवण्यासाठी देशभरात श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. एका रिपोर्टनुसार, 1 मेपासून आतापर्यंत जवळपास 3740 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या. या ट्रेनमधून 20 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यादरम्यान 40 टक्के ट्रेन उशिराने धावल्या. एक ट्रेन जवळपास 8 तास उशिराने धावत होती. 


421 ट्रेन 10 तास किंवा त्याहून अधिक काळ उशिराने धावल्या. तर 373 श्रमिक स्पेशल ट्रेन 10 ते 24 तास लेट होत्या. 78 ट्रेन एक दिवस किंवा त्याहून अधिक काळ उशिरा होत्या. तर 43 ट्रेन अशा होत्या ज्या 30 तास किंवा त्याहून अधिक दोन-तीन दिवस आपल्या निर्धारित वेळेहून उशिराने धावल्या.


रिपोर्टनुसार, बिहार, उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या बहुतांश ट्रेन उशिराने धावल्या. 78 ट्रेन ज्या सर्वाधिक उशिरा धावल्या त्या महाराष्ट्र आणि गुजरातमधून निघणाऱ्या होत्या.


रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रेन उशिरा धावण्याचं कारणं म्हणजे, रुळांवर ट्रेनची संख्या वाढणं, म्हणजे एकाच दिशेने अधिक ट्रेन जाणं. अधिकतर ट्रेन यूपी, बिहारकडे जात होत्या. त्यामुळे अशा मार्गांवर ट्रेनचा दबाव वाढला. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार, ट्रेनचे मार्ग बदलले जातात, बंगाल-ओडिशामध्ये अम्फान वादळामुळे ट्रेनचे मार्ग बदलले गेले. कोणत्याही एका रेल्वे मार्गावर 24 तासांत ट्रेन चालवण्याची मर्यादा असते परंतु एकाच मार्गावर अधिक ट्रेन आल्याने कोंडी होत असल्याचाही परिणाम ट्रेनच्या वेळेवर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.