लडाखमध्ये एक दुर्घटना घडली आहे. दौलत बेग ओल्डी परिसरात टँक प्रशिक्षण सुरु असतानाच 5 भारतीय जवान नदीत वाहून गेले आहेत. पाच सैनिकांसह टी-72 टँक नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरामुळे जवान नदीत बुडाले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जवान शहीद झाले आहेत. लडाखमधील नियंत्रण रेषेवर ही दुर्घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 148 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ सकाळी 1 वाजण्याच्या सुमारास सराव सुरू असताना ही घटना घडली. “घटनेच्या वेळी टँकमध्ये एक जेसीओ आणि चार जवानांसह पाच सैनिक होते. सर्व 5 जवान शहीद झाले आहेत," असं संरक्षण अधिकाऱ्यांनी घटनेनंतर सांगितलं होतं. 



शुक्रवारी दौलत बेग ओल्डी येथे टँक प्रशिक्षण सुरु होतं. यावेळी लष्कराचे अनेक टँक तिथे उपस्थित होते. यावेळी नियंत्रण रेषेजवळ टी-72 टँकच्या माध्यमातून नदी कशी पार करतात हे दाखवलं जात होतं. हे प्रशिक्षण सुरु असताना टँक नदीच्या पाण्यात गेला होता. यावेळी त्यात एक अधिकारी आणि 4 जवान होते.


पण याचदरम्यान नदीचा प्रवाह अचानक वाढला आणि यामध्ये टँक वाहून गेला. यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. पण टँकमधील पाचही जण शही झाले आहेत. या सर्वांचे पार्थिव सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.