सासाराम : बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. दरम्यान, बिहारमध्ये दारुबंदी असताना असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैधरित्या विक्री होणाऱ्या दारुमुळे हे बळी गेल्याने राज्यात एकच खळबळ उडालेय. याप्रकरणी ८ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात छठ पुजा झाल्यानंतर काही लोकांनी शुक्रवारी रात्री जेवणाचे आयोजन केले होते. याच वेळी काही लोकांनी दारु प्राशन केली. ही दारु सेवन केलेल्या पाच लोकांचा मृत्यू झाला. अनेकांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.


या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी नासरीगंज कछवा-आरा महामार्गावर रास्ता रोको केला. घटनास्थळी जिल्हाधिकारी अनिमेष पराशर आणि रोहतासचे पोलीस अधीक्षक मानवजीत सिंह ढिल्लों यांनी धाव घेतली. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 



कछवा ठाण्याचे मुकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले असून अन्य ७ जणाना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, २०१६ ला संपूर्ण राज्यात दारुबंदी करण्यात आली असताना येथे दारु कशी मिळाली, याचा शोध आता घेतला जात आहे.


सोन नदीच्या किनारपट्टीजवळ हे गाव असून येथे अवैध दारू मोठ्याप्रमाणात तयार केली जाते. तेथूनच ही दारु मागवण्यात आली होती. दारुचे सेवन केल्यानंतर सर्वांची प्रकृती बिघडली. सर्वांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण यातील दोघांचा उपचाराला नेताना रस्त्यातच तर उर्वरित तिघांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.