लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Viral Video : कर्नाटकातील एका मंत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकातल्या या मंत्र्याने एका कार्यक्रमात पैशाचा पाऊस पाडल्याचा हा व्हिडीओ आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकातील हे मंत्रीमहोदय चलनी नोटा पायाजवळ घेऊन बसलेले दिसत आहेत. कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका केली आहे. यामध्ये हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात मंत्री शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांच्यावर नोटांचा वर्षाव केला जात असल्याचे दिसत आहे.
कर्नाटक सरकारचे वस्त्रोद्योग व ऊस विकास मंत्री शिवानंद पाटील यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मंत्री शिवानंद पाटील खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले अनेक लोक हवेत नोटा उडवत आहेत. व्हिडीओमध्ये बहुतांश नोटा 500 रुपयांच्या असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये मंत्र्यांच्या पायाजवळच नव्हे तर फरशीवर सर्वत्र नोटा विखुरल्या आहेत, मात्र शिवानंद पाटील त्यांच्या शेजारी बसलेल्या लोकांशी बोलण्यात व्यस्त आहेत.
कर्नाटक भाजपाने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये मंत्री शिवानंद पाटील यांच्यावर हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात चलनी नोटांचा वर्षाव होत आहे. मंत्री शिवानंद पाटील यांनी म्हटलं की, तीन दिवसांपूर्वी ते एका लग्नाला गेले असता ही घटना घडली होती आणि त्यानिमित्ताने कव्वालीचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मी याबाबत कोणतीही भावना व्यक्त केली नाही कारण ही घटना माझ्या मूळ राज्यात नाही तर वेगळ्या राज्यात घडली होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी शूट करण्यात आला होता आणि आता तो व्हायरल होत आहे. कर्नाटकचे ऊस विकास मंत्री शिवानंद पाटील हे काँग्रेस नेते अयाज खान यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 15 ऑक्टोबरला हैदराबादला आले होते. त्यावेळी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओमध्ये मंचावर कलाकार कव्वाली गात आहेत. तर मंत्री शिवानंद पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत कव्वालीचा आनंद घेत आहेत. त्याचवेळी त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले अनेक लोक नोटा हवेत उडवत आहेत. यावेळी कर्नाटकचे मंत्री रहिम खान आणि जमीर अहमद हे देखील उपस्थित होते.
यावरून भाजपाने काँग्रेस नेते शिवानंद पाटील यांना लक्ष्य केले. भाजपाने हे प्रकरण लज्जास्पद असल्याचे म्हटलं आहे. भाजपाने तेलंगणा पोलिसांकडे पक्षाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत निवडणुका हा एक मोठा सण आहे आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मंत्री आपल्या काळ्या पैशाने ते प्रदूषित करण्याचे काम करत आहेत. राज्यातील जनतेच्या लुटलेल्या पैशातून शिवानंद पाटील आनंद घेत आहेत, अशी पोस्ट भाजपाने केली आहे. वाद वाढत असतानाच मंत्री शिवानंद पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी फक्त लग्नात सहभागी होण्यासाठी गेलो होतो, मी तिथे एकही पैसा उडवला नाही, असे पाटील यांनी म्हटलं आहे.