YouTube Channel Ban: केंद्राचा मोठा निर्णय! 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या `या` YouTube Channels वर बंदी
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 YouTube Channel वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये तुमचे तर YouTube Channels नाही ना, पाहा बंदी घातलेल्या सहा YouTube Channels ची यादी...
YouTube Channel Banned In India: सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणाई यामध्ये अडकले असल्याचेही म्हणायला काहीच हरकत नाही. तर दुसरीकडे दिवसेंदिवस या सोशल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे अशा अकाऊंट्सवर सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पीआयबी (PIB) फॅक्ट चेक टीमने या यूट्यूब चॅनेलवरील खोट्या बातम्यांचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने फेक न्यूजमधून कमाई करणाऱ्या 6 चॅनेलचे 100 हून अधिक व्हिडिओ तपासले आणि हे सर्व व्हिडिओ खोट्या बातम्यांवर आधारित असल्याचे दिसून आले.
संवाद टीव्ही (10.9 लाख सबस्क्रायबर्स ), नेशन टीव्ही (5.57 लाख सबस्क्रायबर्स ), संवाद समाचार (3.49 लाख सबस्क्रायबर्स), सरोकार भारत (21 हजार सबस्क्रायबर्स ), राष्ट्र 24 (25 हजार सबस्क्रायबर्स ) आणि स्वर्णिम भारत (6 हजार सबस्क्रायबर्स ) या सहा YouTube Channels वर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
वाचा: भारत- श्रीलंका सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
या सहा चॅनेलने फेक न्यूजच्या व्हिडिओंच्या मदतीने 50 कोटींहून अधिक व्ह्यूज जमा केले होते. तसेच चॅनेल्सवरील व्हिडीओमधून पंतप्रधान, सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, एव्हीएमसारख्या गोष्टींबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं सांगितलं. या व्हिडीओंना 20 कोटींहून अधिक व्ह्यूज होते असंही सरकारने म्हटलं आहे.
यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचा दावा संवाद टीव्हीने एका व्हिडिओमध्ये केला होता. हे दोन्ही दावे खोटे असताना. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चॅनलने दावा केला आहे की, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली आहे. हा व्हिडिओही खोटा असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर संवाद टीव्हीच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना हटवण्याची मागणीही केली होती, अशा अनेक खोट्या बातम्या या 6 YouTube Channel वर पसरवण्यात आले होते.