रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : सध्या देशातील ६१ टक्के Coronavirus कोरोनाबाधित रुग्ण ६ राज्यात आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगाना, कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच ६ राज्यांत सर्वाधिक ५२ लॅब आहेत. त्यामुळेच रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. आता नवीन २१ लॅब स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यापैकी ५ लॅब याच ६ राज्यात स्थापन होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत जस्तीत जास्त टेस्ट होणार नाही तोपर्यंत कोरोना रुग्णाचे खरे आकडे कळणार नसल्याचं विश्व आरोग्य संघटना वारंवार सांगतेय. त्यामुळे अधिकाधिक टेस्ट कराव्या लागणार आहेत. सध्या भारताची परिस्थिती पाहिली तर आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार ५ हजार ७३४ रुग्ण आत्तापर्यंत आढळले आहेत. त्यापैकी ६१ टक्के रुग्ण दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाना, केरळ आणि कर्नाटक या सहा राज्यातील आहेत. या सहा राज्यात देशातील २७.३ टक्के लोकसंख्या आहे. तर टेस्ट करण्यासाठीच्या लॅब सर्वाधिक ५२ टक्के याच राज्यात आहेत. म्हणूनच रुग्णांचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत या ६ राज्यात जास्त दिसून येतोय.


जिथे जास्त लॅब तिथे रुग्णसंख्या जास्त 
- महाराष्ट्रात २९ लॅब, ११३५ रूग्ण
- तामिळनाडु २० लॅब, ७३८ रुग्ण
- दिल्ली १५ लॅब, ६६९ रुग्ण
- तेलंगाना २५ लॅब, ४२७ रुग्ण 
- केरळ १४ लॅब, ३४५ रुग्ण 
- कर्नाटक १४ लॅब, १८१ रुग्ण


जिथे लॅब कमी, तिथे रुग्णसंख्या कमी
- झारखंड २ लॅब, ४ रुग्ण
- बिहार ४ लॅब, ३८ रुग्ण
- छत्तीसगड २ लॅब, १० रुग्ण
- ओरिसा ४ लॅब, ४२ रुग्ण
- उत्तराखंड १ लॅब, ३३ रुग्ण


 


आता आणखी २१ नवीन लॅब बनवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सध्या लॅबमध्ये कर्मचारी दिवसंरात्र दोन शिफ्ट मध्ये काम करत असल्याचं आयसीएमआरचे डॉ. आर. गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे. आत्ता १३ हजार टेस्ट करण्याची क्षमता आहे. मात्र २६ हजार दररोज टेस्ट करण्याची क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी लॅब जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे. परंतु संसर्ग वाढत असून वेळ हातातून निघून जात आहे. इतर राज्यांतील आकडे अद्यापही योग्य प्रकारे समोर आले नाहीत. अशावेळी सरकारची तारेवरची कसरत असणार आहे.