देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. तर ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १४ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात अशी ६ राज्ये आहेत जिथे कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १ लाखाच्या वर गेली आहे.