हरियाणात ६५ टक्के मतदान, काही ठिकाणी गालबोट
हरियाणा राज्यात ६५ टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी काही अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. राज्यात ६५ टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. यमुनागरमध्ये सर्वाधिक ६९.३५ टक्के तर गुडगावमध्ये सर्वात कमी ५० टक्के मतदान झाले. दरम्यान, जसिया येथील एका मतदान केंद्राबाहेर गोळीबार झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर रोहककमध्ये एका युवकाला आणि त्याच्या आईला मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.
तर मेवातमध्ये चार ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन पक्षांच्या समर्थकांमध्ये तुफान दगडफेक झाली. जोरदार हाणामारीत अनेक लोक जखमी झालेत. त्यामुळे या घटनांमुळे मतदानाला गालबोट लागले. दरम्यान, हरियाणात ११६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेसने सर्व ९० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. जननायक जनता पक्षाने ८९ उमेदवार उभे केलेत.
चौदाव्या विधानसभेसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. मुख्यमंत्री खट्टर आणि सर्व दहा खासदारांची कसोटी या निवडणुकीत पणाला लागली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ४७ जागा जिंगल्या होत्या. त्यामुळे या जागा टिकविणे भाजपपुढे मोठे आव्हान आहे.