बंदी घालताच सरकारी कार्यालयाजवळ सापडल्या 2 हजाराच्या नोटा; 1 किलो सोनंही जप्त
2000 Rupees Note : सरकारी कार्यालयातच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापड्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात धाव घेऊन सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरु केली आहे.
2000 Rupees Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी मोठा निर्णय घेत 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार असल्याचेही आरबीआयने सांगितले आहे. मात्र लोकांना आता बॅंकेमध्ये केवळ दोन हजाराच्या (2000 Rupees Note) 10 नोटा जमा करता येणार आहेत. एकीकडे आरबीआयचा हा निर्णय ऐकून सामान्य जनता विचारात असताना राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठं घबाड सापडलं आहे. राजस्थानच्या एका सरकारी कार्यालयात तब्बल 2.31 कोटींचे घबाड सापडले आहे. यासोबत एक किलो सोने देखील सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दोन हजारांच्या नोटांसंबधीत निर्णय आल्यानंतर राजस्थानमध्ये सापडेल्या घबाडामुळे एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच राजस्थान सरकारच्या वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना रात्री अकरा वाजता कार्यालयात धाव घेतली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजेच डीओआयटी (DOIT) या सरकारी विभागाच्या तळघरात ठेवलेल्या कपाटातून करोडो रुपयांचा खजिना सापडल्याची माहिती समोर आली आहे.
कपाटामध्ये 2000 च्या 7,298 नोटा म्हणजेच एक कोटी 45 लाख 96 हजार रुपये सापडले आहेत. तसेच 500 च्या 17 हजार 107 नोटा सापडल्या असून त्यांची किंमत 85 लाख 53 हजार 500 रुपये आहे. यासोबतच एक किलो वजनाची सोन्याचे वीटही सापडली आहे. त्याच्यावर 'मेड इन स्वित्झर्लंड' असे लिहिले होते. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे 62 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
राजस्थान पोलिसांचे पथक या ठिकाणी शुक्रवारी रात्रीच दाखल झाले होते. या विभागातील 7 ते 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अतिरिक्त संचालक महेश गुप्ता यांच्या विशिष्ट माहितीच्या आधारे जयपूर शहर पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी मुख्य सचिव उषा शर्मा आणि पोलीस महासंचालकांनी रात्री उशिरा पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. आयटी विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी त्यांना त्यांच्या तळघरात रोख रक्कम आणि सोन्याचा बार सापडल्याची माहिती पोलिसांना दिली होती, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.
"जयपूर येथील योजना भवनाच्या तळघरातील कपाटात 2.31 कोटी रुपयांहून अधिक रोख आणि सुमारे 1 किलो सोन्याचे बिस्किट सापडले आहे. 102 सीआरपीसी अंतर्गत पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत आणि एका पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जात आहे. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिली आहे," अशी माहिती जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद कुमार श्रीवास्तव यांनी दिली.