नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे. जनसंख्येचा विस्फोट हा येणाऱ्या पिढीसाठी आव्हाने उपस्थित करतो. हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पाऊले उचलायला हवी असेही ते म्हणाले. ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणात त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. समाजातील जो वर्ग आपला परिवार छोटा ठेवतो तो सन्मानास पात्र असल्याचेही ते म्हणाले. असे जे करत आहेत ते एकप्रकराची देशभक्ती करत असल्याचेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित करण्याची ही पहीलीच वेळ आहे. भाजपातील काही नेते यावर खुलेपणाने बोलत असतात. जर जनता शिक्षित आणि स्वस्थ असेल तर देश देखील शिक्षित आणि स्वस्थ बनेल असे ते म्हणाले. त्यामुळे आता मोदी सरकार लोकसंख्येला घेऊन कायदा बनवणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


यावेळी मोदींनी आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा कसा गाठता येईल, यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. तेव्हा मोदींनी देशातील उद्योजकांची पाठराखण केली. त्यांनी म्हटले की, देशात संपत्तीनिर्मिती करणाऱ्यांचा उचित आदर झाला पाहिजे. कारण, संपत्तीनिर्मिती झालीच नाही तर संपत्तीचे वाटपही होणार नाही, याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मोदींनी केला. त्यामुळे संपत्ती निर्मिती करणारे या देशाची संपत्ती असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.



तसेच पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाविषयी बोलताना मोदींनी म्हटले की, मोठी स्वप्ने पाहायलाच पाहिजेत, तरच विकास होऊ शकतो. देशातील लहानसहान घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडली, तर पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्य आहे.