80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप
मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
आपला वाढदिवस साजरा करणं कोणाला आवडत नाही. काहींसाठी अजून एक वर्ष गेल्याचा क्षण तर काहींसाठी वाढल्याची खंत. पण काहीही असलं तरी हा दिवस प्रत्येकजण साजरा करतो. पण जुन्या पिढीतील लोकांसाठी वाढदिवस म्हणजे घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं इतकंच काय ते असतं. मध्य प्रदेशातील एका आजोबांनी 80 वर्षं आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. पण जेव्हा केला तेव्हा मात्र तो दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.
खरगोन येथील 80 वर्षाय आजोबांनी पहिल्यांदा आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी आपल्या मित्र आणि नातलगांसह केक कापला. यानंतर त्यांना डान्स करत आनंदही साजरा केला. पण आनंदात घालवलेला हा क्षण त्यांच्या आयुष्यातील शेवटचा होता. मध्यरात्री 3 वाजता त्यांचं निधन झालं.
80 वर्षीय नारायण सिंह रघुवंशी यांनी आयुष्यात पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा केला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी मित्रांनी, नातेवाईकांनी गर्दी केली होती. रात्री 12 वाजेपर्यंत रघुवंशी समाजातील लोक गर्दी करत होते. अगदी धुमधडाक्यात नारायण सिंह रघुवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
वाढदिवस असल्याने ढोल-ताशेही मागवण्यात आले होते. उत्साह, मस्ती या वातावरणात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी गेलं होतं.
दरम्यान रात्री 3 वाजता नारायण सिंह रघुवंशी यांना ह्रदयविकाराचा झटका आलं आणि त्यांचं निधन झालं. ते आपल्या मित्रांसह जिथे योगा करायचे त्या मुक्तिधाम येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी उसळली होती. वाढदिवसाच्या रात्रीच नाराणय सिंह रघुवंशी यांचं निधन झाल्याने लोक शोक व्यक्त करत आहेत.
नारायण सिंह रघुवंशी रोज पहाटे 6 वाजता योगा करायचे. योगा करणाऱ्या त्यांच्या मित्रांनीच वाढदिवसाचं हे आयोजन केलं होतं. त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. 80 वर्षांचे असतानाही ते नियमितपणे योगा करत असत. आपल्या वाढदिवशीच ते जगाचा निरोप घेतील असा विचार कोणी केला नव्हता.