Crime News: जोडपं भरवस्तीत किस करत असल्याने तरुणाने त्यांना हटकलं असता त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाजियाबादमध्ये (Gaziabad) ही घटना घडली आहे. जोडपं धावत्या स्कुटीवर किस करत असताना 27 वर्षीय पीडित तरुणाने त्यांना रोखलं होतं. यानंतर आरोपी तरुणाने आपल्या मित्रांना बोलवून काठी आणि विटांनी त्याच्यावर हल्ला करत जीव घेतला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट मिश्रा असं मृत तरुणाचं नाव आहे. भाजी मार्केटमध्ये दिवसा अकाऊंटंट आणि संध्याकाळी जीम ट्रेनर म्हणून तो काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एल आर कॉलेजजवळ ही घटना घडली. बंटी कुमार या घटनेचा साक्षीदार असून त्यानेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


"मनिष कुमार नावाच्या एका तरुणाला मी स्कुटीवर महिलेला किस करताना पाहिलं. विराट मिश्रा याने त्याला रोखलं आणि रहिवासी वस्तीत असे प्रकार न करण्यास सांगत हटकलं. यावर संतापलेल्या मनिष कुमारने परिसरातील आपल्या मित्रांना बोलावलं आणि काठी, विटांनी त्याला बेदम मारहाण केली. मी मध्यस्थी करत विराटला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मलाही मारहाण केली. यानंतर ते घटनास्थळावरुन पळून गेले," अशी माहिती बंटीने पोलीस तक्रारीत दिली आहे.


विराट मिश्रा याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्याला दिल्लीमधील रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आलं. येथे त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्व सहा आरोपींना अटक केली आहे. "सर्व सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मनीष कुमार, मनीष यादव, गौरव कासना, आकाश कुमार, पंकज सिंग आणि विपुल कुमार अशी त्यांची नावं आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


विराटचे वडील सुदाम मिश्रा यांनी सांगितलं आहे की "आमच्या घरात माझा मुलगाच एकमेक कमावता होता. आरोपींनी माझ्या मुलाला बेदम मारहाण केला. त्यांनी बाईकचा सायलेंसर काढून त्याच्या डोक्यात घातला".