मोतिहारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरासह विदेशातही अनेक चाहते आहेत. परंतु बिहारमधील चंपाचरण जिल्ह्यात पंतप्रधानांचा एक असा चाहता आहे, ज्याने लोकसभा निवडणूकीत झालेल्या मोदींच्या वियजाच्या आनंदात स्वत:च्या छातीवर चक्क चाकूने 'मोदी' असं नाव लिहिलं आहे. या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर बिहारमधील मोतिहारी, तुरकौलिया येथे राहणाऱ्या सोनू पटेल या व्यक्तीने आपल्या छातीवर 'मोदी' असं लिहिलंय. जेव्हा तो छातीवर चाकूने मोदी लिहित होता, त्यावेळी गावातील अनेकांनी मोठी गर्दी केल्याचं रहिवाशांनी सांगितलं. 


छातीवर 'मोदी' लिहिल्यानंतर सोनू मोदी जिंदाबाद अशा घोषणाही देत होता. 'नरेंद्र मोदी जिंदाबाद आहेत आणि जिंदाबाद राहणार. मोदी देशासाठी सर्वस्व अर्पण करत आहेत. मोदी संपूर्ण आयुष्यभर या देशात राहू देत. या देशाचा विकास करु दे, इतकंच मला सांगायचं आहे. जय मोदी. जय हिंद, जय भारत' असं  सोनूने म्हटलंय.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरातून अभूतपूर्व यश मिळवलं. बिहारमध्ये एनडीएने ४० जागांपैकी ३९ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ एक जागा मिळवण्यात यश मिळालं. तर लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.