उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे पोलिसांनी चक्क म्हशीच्या सहाय्याने तोडगा काढल्याचा भन्नाट प्रकार समोर आला आहे. ही म्हैस आपल्या मालकाच्या घऱातून बेपत्ता झाली होती. यानंतर तिच्या मालकीवरुन वाद निर्माण झाला होता. पंचायतदेखील हा वाद सोडवण्यात अयशस्वी ठरली होती. यानंतर पोलिसांनी म्हशीला रस्त्यावर सोडून दिलं होतं. म्हशीने अखेर आपल्या मालकाचं घर शोधलं आणि वादावर तोडगा निघाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेशगंज पोलिस स्टेशन अंतर्गत राय असकरनपूर गावातील रहिवासी नंदलाल सरोज यांची म्हैस काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती.  म्हैस पुरे हरिकेश गावात भरकटली  होती जिथे हनुमान सरोजने तिला पकडलं होतं. नंदलाल सरोज तीन दिवसांपासून म्हशीचा शोध घेत होते. अखेर तीन दिवसांनी तिचा शोध लागला असता हनुमान सरोजने मात्र तिला परत करण्यास नकार दिला. 


पोलिसांनी म्हशीवर दावा करणाऱ्या दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं. पंचायतीने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण कित्येक तास झाले तरी तोडगा निघत नव्हता. याचं कारण दोघेही म्हैस आपलीच असल्याचा दावा करत होते. महेशगंज पोलीस ठाण्याचे एसएचओ श्रवण कुमार सिंह यांनी अखेर वाद मिटवण्यासाठी मार्ग काढला.


श्रवण कुमार सिंह यांनी पंचायतीसमोर निर्णय म्हशीवरच सोडण्याची घोषणा केली. म्हशीला रस्त्यावर एकटी सोडली जाईल आणि ती ज्याच्या मागे जाईल त्याला मालक घोषित केलं जाईल असं सांगण्यात आलं. गावकऱ्यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली आणि नंदलाल आणि हनुमान दोघांनाही त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने उभे राहण्यास सांगण्यात आलं.


त्यानंतर पोलिसांनी म्हशीला पोलीस स्टेशनमधून सोडले आणि ती थेट नंदलालच्या पाठोपाठ राय अस्करनपूर गावाकडे निघाली. निर्णयानुसार म्हैस नंदलाल यांच्या ताब्यात देण्यात आली.