इंदोरमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाला मारहाण केल्याप्रकरणी महाराजा यशवंतराव रुग्णालयातील (एमवायएच) एका कनिष्ठ डॉक्टरला निलंबित करण्यात आलं आहे. रुग्णाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नव्हती. डॉक्टरने फाईल तपासली असता त्यातून हे उघड झालं. यामुळेच डॉक्टराने रुग्णाला मारहाण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांवेरच्या पंचचिडिया येथील 45 वर्षीय नागरिकाचा रस्ते अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता. जखमीला एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण हाड जास्त तुटलं असल्याने त्याला उपचारासाठी उज्जैनच्या एमवायएच रुग्णालयात पाठवण्यात आलं.


इंदोरच्या एमवायएच रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टर आकाश कौशल उपचार सुरु करण्याआधी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांकडून तो एचआयव्ही पीडित असल्याची माहिती देण्यात आली नसल्याने नाराज होता. यानंतर त्याने आधीच वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णाला ड्रेसिंग टेबलवरच मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टर रुग्णाला एकामागोमाग एक कानाखाली मारत होता. यादरम्यान त्याने शिवीगाळही केली. 


एमवायएच रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर पमेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, हाडांचे रोग विभागातील डॉक्टर आकाश कौशल यांना तात्काळपणे निलंबित करण्यात आलं आहे. एमवायएच शहरातील सरकारी महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजशी संलग्न आहे. डीन डॉक्टर संजय दीक्षित यांनी याप्रकरणी तपास करण्याचे आणि तीन दिवसांत रिपोर्ट सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याचा आदेश दिला आहे. 


रुग्णाच्या नातेवाईकांनी दावा केला आहे की, "आम्ही रुग्णाला उपचारासाठी एमवायएचमध्ये आणलं होतं. त्याला आधीपासूनच एचआयव्हीची लागण आहे. एचआयव्ही संक्रमित असल्याची माहिती न दिल्याने ज्युनिअर डॉक्टरने त्याला मारहाण केली. मी मध्यस्थी केली असता, मलाही मारहाण केली". पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. 


एड्स रुग्णासह भेदभाव केल्यास दंड आणि शिक्षा


एचआयव्ही कलम 2017 अंतर्गत, एचआयव्ही रुग्णाला चुकीची वागणूक दिल्यास किंवा भेदभाव केल्यास 3 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंतची शिक्षा तसंच 1 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.