गुजरातच्या सूरतमध्ये बोगस डॉक्टरांनी थेट रुग्णालयात उभं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर मोठे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची पाहुणं म्हणून नावं देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी संवाद न साधताच ही नावं छापण्यात आली होती. प्रशासनाला याची माहिती मिळताच हे हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात आलं. तिथे एखाद्यावर उपचार करुन जीव धोक्यात घातला जाऊ नये यासाठी राज्य सरकारने मध्यस्थी करत हे रुग्णालय बंद केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच सह-संस्थापकांपैकी दोघांकडे बनावट डिग्री आहे. इतर तिघांकडे असणाऱ्या पदवीवरुनही साशंकता उपस्थित केली जात असून पोलीस यासंबंधी तपास करत आहेत. 


सध्या बंद पडलेले जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरतच्या पांडेसरा भागात उभारण्यात आले होते. रविवारी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. "उद्घाटन कार्यक्रमाच्या पॅम्प्लेटमध्ये आयुर्वेदिक औषधाची पदवी असलेले डॉक्टर म्हणून सांगण्यात आलेला बीआर शुक्ला याच्यावर गुजरात मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो बनावट डॉक्टर आहे," असं वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितलं आहे.


वरिष्ठ पोलीस म्हणाले की, इलेक्ट्रो-होमिओपॅथीमध्ये पदवी घेतल्याचा दावा करणारे दुसरे सह-संस्थापक आरके दुबे वैद्यकीय व्यवसाय कायद्यांतर्गत खटल्याचा सामना करत आहेत. "या दोघांकडे बनावट पदव्या आहेत. आणखी एक सह-संस्थापक जी.पी. मिश्रा याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत तीन प्रकरणं आहेत. त्यांच्या पदवीची पडताळणी होणं बाकी आहे. आमंत्रणावरील इतर दोन नावांच्या पदवीचीही आम्ही पडताळणी करत आहोत," असं गुर्जर म्हणाले.


सूरत महापालिका आयुक्त शालिनी अग्रवाल, पोलीस आयुक्त अनुपम सिंग गहलौत आणि सह पोलीस आयुक्त राघवेंद्र वत्स यांच्यासह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावे उद्घाटनाच्या निमंत्रणावर होती. अधिकाऱ्यांनी मात्र अशा कोणत्याही निमंत्रणाची माहिती नव्हती असं सांगितलं आहे. त्यापैकी कोणीही कार्यक्रमाला उपस्थित राहिलं नाही.


रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे. "इतर सह-संस्थापकांच्या डिग्रीची पडताळणी केली जात आहे. निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल," असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.