असा बाप पाहिजे! सासरी होत होता मुलीचा छळ; वडील बँड बाजा वाजवत पोहोचले अन्....; गावात एकच चर्चा
झारखंडमधील रांची येथे एका बापाने सासरी छळ होणाऱ्या मुलीला बँड-बाजा वाजवत आणि फटाके वाजवत माहेरी आणलं आहे. बापाने काढलेल्या या वरातीची चांगलीच चर्चा आहे.
आपल्याकडे मुलीला लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं आता घर असून, तिकडे कोणालाच न दुखवता संसार करण्यास सांगितलं जातं. अनेकदा तर सासरहून आता फक्त मृतदेह बाहेर पडेल अशीही शिकवण दिली जाते. यामुळेच अनेकदा मुली सासरी छळ होत असतानाही आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे तक्रार करत नाहीत. पण झारखंडच्या रांची येथील एका पित्याने या जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना छेद दिला असून, थेट वरात काढत मुलीला माहेरी आणलं आहे. सासरी छळ होत असल्याने त्यांनी थेट वरात काढत मुलीला घरी आणलं. यावेळी फटाकेही फोडण्यात आले.
पित्याने 15 ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या वरातीचा व्हिडीओ सोमवारी आपल्या फेसबुक अकाऊंटला शेअर केला असून त्यात लिहिलं आहे की, "फार अपेक्षा आणि उत्साहात लोक आपल्या मुलींचं लग्न करतात. पण जेव्हा तिचा जोडीदार आणि कुटुंब चुकीचं ठरतं किंवा चुकीचं काम करतं तेव्हा तुम्ही आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी आणलं पाहिजे. कारण मुली अनमोल असतात".
गतवर्षी झालं होतं लग्न
रांचीच्या कैलाश नगर कुम्हारटोली येथे राहणाऱ्या प्रेम गुप्ता यांचं म्हणणं आहे की, 25 एप्रिल 2022 ला त्यांनी फार धुमधडाक्यात आपली मुलगी साक्षी गुप्ताचं लग्न सचिन कुमार नावाच्या तरुणाशी केलं होतं. तो झारखंड वीज वितरण महामंडळात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असून रांची येथील सर्वेश्वरी नगर येथील रहिवासी आहे.
प्रेम गुप्ता यांचा आरोप आहे की, काही दिवसांपूर्वी सासरी मुलीचा छळ होऊ लागला होता. पती तिला वारंवार घराबाहेर काढू लागला होता. जवळपास एका वर्षाने साक्षीला कळलं की, ज्याच्याशी तिचं लग्न झालं आहे त्याने याआधी दोन लग्नं केली आहे. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
नातं वाचवण्याचा केला प्रयत्न
साक्षीचं म्हणणं आहे की, सगळी माहिती मिळाल्यानंतरही मी पराभव मानला नव्हता आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शोषण आणि छळ होऊ लागल्याने त्याच्यासह राहणं मला अवघड होऊ लागलं होतं. यामुळेच मी या नात्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. वडिलांनी आणि माहेरच्यांनी साक्षीचा हा निर्णय मान्य करत तिला पाठिंबा दिला. यानंतर सासरच्या घरातून बँड बाजासह, फटाके वाजवत मिरवणूक काढून तिला माहेरी आणलं.
आपली मुलगी शोषणापासून मुक्त झाल्याच्या आनंदात त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्रेम गुप्ता सांगतात. घटस्फोटासाठी साक्षीने कोर्टात केस दाखल केली आहे. पतीला पोषणभत्ता देण्याबाबत सांगितलं आहे. या घटस्फोटाला लवकरच कायदेशीर मान्यता मिळण्याची कुटुंबाला अपेक्षा आहे.