नवी दिल्ली : महागड्या आणि लक्झरी कार चोरणार्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिटने अटक केली आहे.


२८ आलिशान गाड्या जप्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टोळी दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब, राजस्थान आणि पूर्वेकडील राज्यांत कारचोरी करत असे. या टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून २८ आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.


आरोपींविरोधात ५० गुन्हे दाखल


अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींविरोधात मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी नरेंद्र सिंह, लाल बहादुर आणि सारिक यांना मेरठमधून अटक केली. त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून या गाडीमध्ये नकली बनावट प्लेटही ठेवण्यात आली होती. तर, सोनू नावाच्या आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे.


कंटेनरमधून करत असत कार सप्लाय


पोलीस उपायुक्त राजेश राव यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु असून आणखीन वाहन सापडण्याची शक्यता आहे. हे टोळी वाहन चोरी केल्यानंतर एका कंटनेरमधून पूर्वेतील राज्यांमध्ये सप्लाय करत असे.



पोलिसांची टीम नागालँडला रवाना


पोलिसांची एक टीम नागालँडमध्ये पाठवण्यात आली असून या टोळीशी संबंधितांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.


या कारवाई दरम्यान, कारचोरी करण्यासाठी लागणारे हत्यारंही पोलिसांनी सोनू नावाच्या आरोपीकडून जप्त केली आहेत. सोनी हा एक मॅकेनिक होता आणि नोकरी गेल्यानंतर त्याने कार चोरी करण्याचं काम सुरु केलं.