टिकली लावल्याने शिक्षिकेने लगावली कानाखाली; मुलीने घेतला टोकाचा निर्णय, घरी पोहोचताच दरवाजा बंद केला अन्...
टिकली लावल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर कानाखाली लगावल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. मुलीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शाळा म्हणजे मुलांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करणारी एक संस्थाच असते. येथे होणारे चांगले वाईट संस्कार मुलांच्या मनात कायमचं घर करतात. याच ठिकाणी त्यांना आपले आयुष्यभराचे गुरु, सवंगडी मिळत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाही फार असतात. पण जेव्हा गुरस्थानी असणारे शिक्षकच सर्वांसमोर अपमान करतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनाही फार असतात. असाच काहीसा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. शिक्षिकेने शाळेत सर्वांसमोर कानाखाली लगावल्याने अपमानित झालेल्या विद्यार्थिनीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.
झारखंडमधील धनाबाद येथे दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. शाळेत टिकली लावून आल्याने शिक्षिकेने तिला कानाखाली लगावली होती. यामुळे नाराज झालेल्या मुलीने घरी गेल्यानंतर पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुख्याधापक आणि शिक्षिकेला जबाबदार धरलं. याआधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय उषा कुमारी शाळेत टिकली लावून गेली होती. दरम्यान, प्रार्थना सुरु असताना शिक्षिकेने टिकली लावल्याने तिच्या कानाखाली लगावली होती. यामुळे तिला अपमानजनक वाटत होतं. घरी पोहोल्यानंतर तिने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना उद्देशून पत्र लिहिलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या शाळेच्या गणवेशात चिठ्ठी ठेवली होती. चिठ्ठीत तिने आत्महत्येसाठी शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांना जबाबदार धरलं.
या घटनेनंतर मुलीचे नातेवाईक आणि स्थानिकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केलं. आरोपी शिक्षिका आणि मुख्याधापकांविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं.
पोलीस अधिकारी आशिष कुमार यादव यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की "सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. आम्ही याप्रकरणी सेंट झेवियर्स शाळेचे मुख्याध्यापक आणि आरोपी शिक्षिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन केलं. पण कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली".