चेन्नईच्या थालंबूर येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका आरोपीने वाढदिवशीच मैत्रिणीची हत्या केली. पोलिसांनी तपास केला असता काही हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या. आरोपी हा मूळत: मुलगा नसून मुलगी आहे. त्याची मृत तरुणीशी मैत्री होती. आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याची इच्छा असल्याने आरोपीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. मुलगी शस्त्रक्रिया करुन मुलगा झाली होती. पण यानंतही मृत तरुणी नंदिनीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. यामुळेच संतापलेल्या आरोपीने नंदिनीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वेट्रिमरनला अटक केली आहे. वेट्रिमरनने काही दिवसांपूर्वी सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. सेक्स चेंज करण्याआधी तिचं नाव पंडी मुरुगेश्वरी होतं. 


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं आहे की, मुरुगेश्वरी आणि नंदिनी दोघीही मदुराईमधील मुलींच्या शाळेत शिकत होत्या. दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. यानंतर मुरुगेश्वरीने नंदिनीशी लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण नंदिनीने वेट्रिमरनशी नातं ठेवण्यास नकार दिला होता. पण दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. 


वाढदिवशीच केली हत्या


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नंदिनी आठ महिन्यांपूर्वी नोकरीसाठी चेन्नईत आली होती. तिथे ती आपल्या काकांसोबत राहत होती. शनिवारी वेट्रिमरनने नंदिनीला फोन केला आणि सोबत काही वेळ घालवण्यास सांगितलं. दोघांनी कपड्यांची खरेदी केली आणि तांबरम येथील अनाथलायतही गेले. 


आरोपीने नंदिनीला घर सोडण्याबद्दल सांगितलं. यानंतर पोंमर येथे निर्मनुष्य ठिकाणी थांबत नंदिनीला फोटो काढण्यास सांगितलं. याचवेळी आरोपीने नंदिनीचे हात-पाय बांधले आणि ब्लेडने गळा, हातावर वार केले. यानंतर पेट्रोल टाकून पेटवून देत घटनास्थळावरुन पळ काढला. 


नंदिनीची आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना कळवलं. हॉस्पिटलला जाण्याआधी नंदिनीने पोलिसांना वेट्रिमरनचा नंबर दिला. पोलिसांना बोलावलं असता त्याने आपण नंदिनीचा मित्र असल्याचं सांगितलं. यादरम्यान उपचार सुरु असताना नंदिनीचा मृत्यू झाला. यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेट्रिमरनला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाही. चौकशीदरम्यान तो अत्यंत संयमी होता. पोलिसांनी विचारणा केली असता, नंदिनीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याने एका खासगी रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण नंदिनीने त्याला आपलं काही भविष्य नसल्याचं सांगितलं होतं. यादरम्यान नंदिनी कार्यालयातील एका तरुणाच्या प्रेमात होती. याच रागातून आरोपीने हे कृत्य केलं.