आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या कर्जाची मुलीला मोजावी लागली मोठी किंमत, शेजारचा म्हातारा रोज रात्री....
आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या बदल्यात 60 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
Crime News: छत्तीसगडच्या (Chhatisgarh) धमतरी येथील माणुसकीलाही लाजवणारी बलात्काराची (Rape) एक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या वयस्कर शेजाऱ्याकडून 5000 रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ असल्याने महिलेच्या मुलीला मात्र मोठी किंमत मोजावी लागली. आरोपीने पैसे दिल्याचा फायदा घेत मुलीचं सतत लैंगिक शोषण (Sexual Assault) केलं. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं समजल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
कुरुद परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पीडितेच्या आईने 17 जानेवारीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. महिलेने ऑक्टोबर 2022 मध्ये पैसे उधार घेतले होते.
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, घरातील आर्थिक स्थिती योग्य नसल्याने शेजारी सुदर्शन नागरची याच्याडून आपण 5000 रुपये उधार घेतले होते. पैसे मागितले होते त्याच दिवशी आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावत जबरदस्ती केली होती. तसंच याबद्दल कुठे भाष्य केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीने भीतीपोटी कुठेही वाच्यता केली नाही. याचात फायदा घेत आरोपीने तिच्यावर सतत बलात्कार केला.
सतत लैंगिक शोषण होत असल्याने मुलीची प्रकृती बिघडली. महिलेने रुग्णालयात जाऊन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झालं.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी 60 वर्षीय आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. 29 जानेवारीला अटकेची कारवाई करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत कारवाई केली आहे.