Bride Groom Road Accident: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. यानतंर प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळं वळण आणि कलाटणी मिळत असते. यापुढचं आयुष्य आपण त्या जोडीदारासोबत घालवणार असल्याने एक वेगळी उत्सुकता, आनंद असतो. पण बिहारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे. लग्नानंतर काही तासातच सर्व आनंद दु:खात परिवर्तित झाला. लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. मुलीची पाठवणीदेखील झाली. पण घरी पोहोचण्याआधीच असं काही झालं की, त्यांच्या जागी त्यांचे मृतदहे घरी पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांलदा येथे लग्न झाल्यानंतर नवरामुलगा नववधूला घेऊन निघाला होता. मुलीची पाठवणी होत असल्याने तिच्या कुटुंबाला अश्रू अनावर होत होते. भरल्या डोळ्यांनी त्यांनी मुलीला निरोप दिला आणि आता ती परक्या घरी गेल्याचं सांगत मन घट्ट केलं होतं. घरातून निघाल्यानंतर नवविवाहित जोडप्यानेही पुढील आयुष्याची स्वप्नं रंगवली होती. पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांची स्वप्नं सत्यात उतरणं तर सोडा ती पूर्ण पाहूनही झालेली नव्हती तोवर त्यांना आपला जीव गमवावा लागला. 


घऱी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर नवविवाहित दांपत्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. हसनपूर गावाजवळ त्यांची गाडी दुर्घटनाग्रस्त झाली आणि दोघांनीही जागीच जीव गमावला. ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. 


अपघातात जीव गमावणाऱ्या नवविवाहित जोडप्याचं नाव पुष्पा कुमार आणि श्याम कुमार होतं. नालंदाच्या सतौआ गावातील रहिवासी कारु चौधरी यांच्या 19 वर्षीय मुलगी पुष्पा कुमारीचं लग्न नवादा जिल्ह्यातील श्याम कुमारशी ठरलं होतं. 


श्यामच्या लग्नासाठी कुटुंबाने जय्यत तयारी केली होती. मोठ्या उत्साहात लग्नाची वरात घेऊन कुटुंबीय नालंदाला पोहोचले होते. लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण लग्नानंतर काही तासातच लग्नघरात शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच सगळीकडे शोक व्यक्त होऊ लागला होता. 


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरने नवदांपत्याच्या गाडीला धडक दिली होती. यामुळे कारचा दरवाजा उघडला गेला आणि जोडपं खाली रस्त्यावर पडलं. याचवेळी समोरुन जाणाऱ्या ट्रकने दोघांना चिरडलं. ज्यामुळे दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातात इतर नातेवाईकही जखमी झाले आहेत. यामध्ये एक लहान मुलगाही आहे. सर्व जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.