....म्हणून मशिदीत हिंदू रितीरिवाजांनी पार पडला विवाहसोहळा
हिंदू चालिरितींप्रमाणे...
तिरुवअनंतपूरम : सामाजिक बांधिलकीचं प्रतीक म्हणून केरळच्या कायमकूलम येथील Cheravally Muslim Jamaath Committeeकडून एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं. त्यांच्या या कृतीची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. या प्रशंसेस कारण म्हणजे, Cheravally Muslim Jamaath Committeeने मशिदीमध्ये हिंदू विवाहसोहळ्याचं आयोजन केलं होतं.
क्रिष्णपूरमच्या सारथ शशी आणि चेरावेल्लीच्या अंजू अशोक यांनी हिंदू चालिरितींप्रमाणे पारंपरिक पद्तीने आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. हिंदू ब्राह्मणांनीच या विवाहसोहळ्याचे विधी पार पाडले.
Cheravally Muslim Jamaath Committeeने या विवाहसोहळ्यासाठी खास तयारी केली होती. यामध्ये फक्त मुस्लिमच नव्हे, तर हिंदू समुदायातील अनेकांनीच मदतीचा हात पुढे केला होता. शिवाय या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठीसुद्धा अनेकांनी गर्दी केली होती. लग्नसोहळ्याचं आयोजन करण्याव्यतिरिक्त Cheravally Muslim Jamaath Committeeने पारंपरिक अशा 'सद्या' या पद्धतीच्या शाकाहारी मेजवानीचंही आयोजन केलं होतं. ज्याचा आस्वाद १००० पाहुण्यांनी घेतला.
अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात अंजूला भेट स्वरुपात १० तोळे सोनं आणि २ लाख रुपये देण्यात आले. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी या अनोख्या उपक्रमाची प्रशंसा केली. केरळमधील एकतेचं हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हणत त्यांनी Cheravally Muslim Jamaath Committee, नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
अंजूच्या वडिलांचं जवळपास दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या आईने आपल्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी आपली परिस्थिती नसल्यामुळे मशिदीच्या कमिटीकडे मदतीचा हात मागितला. 'तिची आई माझ्या घरी लग्नसोहळ्यासाठीची मदत मागण्यासाठी आली. त्यांच्याकडून एक पत्रक देण्यात आलं होतं, जे मी Jamaath committeeपुढे सादर केलं. आम्हीही त्या कुटुंबाला मदत करत हा विवाहसोहळा पार पाडण्याची जबाबदारी घेतली', अशी माहिती Jamaath committeeचे सचिव नजूमुदीन अल्लूम्मूट्टील यांनी दिली. Jamaath committeeने या प्रसंगी दिलेली मदत पाहता नवविवाहितांच्या कुटुंबीयांनेही त्यांचे आभार मानले.