बायकोला तडफडताना पाहण्यासाठी विहिरीत ढकललं अन् नंतर...`; ती ओरडत होती पण पतीने फक्त व्हिडीओ काढला
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील एक क्रूर आणि धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हुंड्यासाठी एका पतीने पत्नीला विहिरीत ढकललं आणि नंतर रशी टाकली. इतकंच नाही तर त्याने तिथे उभा राहून जीवाची भीक मागणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ शूट केला.
मध्य प्रदेशात हुंड्यासाठी पतीने पत्नीला अत्यंत क्रूर वागणूक दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीमच जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. येथे एका पत्नी हुंड्यासाठी पत्नीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून दिलं. इतकंच नाही तर ती बुडू नये आणि तडफडत राहावं यासाठी तिच्याकडे रशीही दिली होती. त्याचं हे क्रूर कृत्य इतक्यावरच थांबलं नाही. पत्नी विहिरीत लटकत असताना आपल्या जीवासाठी भीक मागत होती. यावेळी पतीने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सासरच्यांना पाठवून दिला.
ही घटना जावद पोलीस ठाण्याच्या किरखेडा क्षेत्रात घडली आहे. गावात राहणारा राकेश कीर याचा तीन वर्षांपूर्वी राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील उषाशी लग्न झालं होतं. पण लग्नानंतर राकेश कीर पत्नीला हुंड्यासाठी त्रास देऊ लागला होता. वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्या पत्नीचा छळ करत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने क्रूरतेची हद्द गाठली.
राकेश कीर याने हुंड्यासाठी पत्नीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून दिलं. यावेळी त्याने ती बुडणार नाही याची काळजी घेतली होती. त्याने पत्नीला रशीच्या सहाय्याने विहिरीत लटकवत सोडलं होतं. पत्नी विहिरीच्या आतून आपल्याला जीवे मारु नका, सोडून द्या असा आक्रोश करत त्याला विनवण्या करत होती. पण आरोपी पतीने काहीच ऐकलं नाही. पत्नी जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत असताना तो बाहेर उभा राहून सर्व मजा पाहत होता. त्याची क्रूरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने विहिरीतून रडत आक्रोश करणाऱ्या आपल्या पत्नीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
कुटुंबीयांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर महिलेला बाहेर काढण्यात आलं. यानंतर पीडित महिलेने आपल्या माहेरी जाऊन सगळा घटनाक्रम सांगितला. पीडित कुटुंबाने पोलिसांना पतीने शूट केलेला व्हिडीओही दाखवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
जावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलम पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच आरोपीला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.