Crime News: संसार म्हटलं की त्यात वादही आलेच. पण पती आणि पत्नीमधील हे वाद अनेकदा टोकाचं पाऊल गाठतात. त्यात जर तुमचा जोडीदार पजेसिव्ह असेल तर मग ते परिसीमा गाठतात. कर्नाटकच्या म्हैसूरमधील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला तब्बल 12 वर्षं घरात कोंडून ठेवलं होतं. पत्नीनेच हा दावा केला असून पोलिसांनी तिची सुटका केली आहे. पण इतकं होऊनही पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. तसंच आपल्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेचं वय 30 वर्षं असून, तिने पतीने आपल्याला 12 वर्षं घरात कोंडून ठेवला असा दावा केला आहे. आपण घरात शौचासाठी आणि लघुशंकेसाठी एक छोटा बॉक्स वापरत होती असं महिलेचं म्हणणं आहे. 


महिलेने पुढे सांगितलं आहे की, दांपत्याची दोन्ही मुलं शाळेतून आल्यावर घराबाहेरच थांबत असत. पती कामावरुन परतल्यानंतरच मुलांना घरात घेतलं जात होतं. "आमच्या लग्नाला 12 वर्षं झाली आहेत. तो नेहमी मला घरात लॉक करायचा आणि छळ करायचा. आमच्या परिसरातील कोणीही त्याला काही विचारणा करत नसे. माझी मुलं शाळेत जायची. पण पती कामावरुन येईपर्यंत त्यांना घऱाबाहेरच थांबावं लागत होतं. मी मुलांना खिडकीतून जेवत देत असे," असं पीडित महिलेने सांगितलं आहे.


दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिलेचा दावा फेटाळला आहे. महिला गेली 12 वर्षं नव्हे तर मागील 2 ते 3 आठवड्यांसाठीच घरात बंद होती असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. "तिच्या फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. ती गेल्याच आठवड्यात आपल्या माहेरी गेली होती. पती कामाला जाण्यापूर्वी पत्नीला घऱात बंद करुन जात होता. तो फार असुरक्षित होता. त्यांचं समुपदेशनही करण्यात आलं आहे," असं पोलीस अधिकारी म्हणाले आहेत.


पतीचं हे तिसरं लग्न आहे. ही महिला त्याची तिसरी पत्नी होती. महिलेची सुटका केल्यानंतर तिचंही समुपदेशन करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतरही तिने तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. आपल्याल पतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे. आपण आपल्या माहेरी राहणार असून तिथेच सर्व भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करु असं तिने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.