कायदा हा सर्वांसाठी समान असतो. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सरकारी पदावर असलेली व्यक्ती, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं आवश्यक असतं. पण अनेकदा आपल्या पदांचा वापर करत कायद्याचं उल्लंघन करत त्याचा गैरवापर केला जातो. अशावेळी पोलीसही नोकरी जाईल या भीतीपोटी कारवाई करत नाहीत. पण जेव्हा कारवाई होते तेव्हा काय स्थिती असते हे दर्शवणारी एक घटना समोर आली आहे. जेव्हा एखाद्याला आपल्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या पदाचा अहंकार असतो तेव्हा काय होतं हे दाखवणारी ही घटना धक्कादायक आहे. याचं कारण नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी उचलल्याने न्यायाधीशाच्या मुलाने भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली लगावण्याची भाषा केली आहे. या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर झालं असं की, उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगध्ये उभी केलेली गाडी उचलल्याने तरुणाने रस्त्यावरच गोंधळ घातला. आपण न्यायाधीशांचा मुलगा असल्याचा या तरुणाचा दावा आहे. गाडीवर ही कोणाची कार आहे याचा उल्लेख असतानाही कारवाई केल्याने जिल्हा न्यायाधीशांच्या मुलाचा संताप झाला आणि त्याने पोलिसांना थेट कानाखाली लगावण्याची भाषा करत धमकावलं. 


पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार हजरतगंजमधील नो-पार्किंग झोनमध्ये उभी होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनने गाडी उचलण्यापूर्वी लाऊड स्पीकरवरुन कार मालकांनी त्यांची वाहनं हटवावीत, अन्यथा गाड्या टो केल्या जातील अशी घोषणा केली होती.. मात्र, वाहनमालक न आल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी जॅमर लावून गाडी उचलून नेली होती.


कारलाचक तरुण कार नेण्यासाठी आला असता त्याला ती पार्किंगमध्ये दिसली नाही. त्याने जेव्हा आजुबाजूला चौकशी केली तेव्हा नो पार्किंगमध्ये असल्याने वाहतूक पोलिसांनी कार टो केल्याचं त्याला समजलं. 


या कारवर जिल्हा न्यायाधीश असं लिहिण्यात आलं होतं. तसचं कारना नंबर गाझियाबादच्या रजिस्ट्रेशनचा होता. दरम्यान, यानंतर न्यायाधीशांचा मुलगा कार नेण्यासाठी पोहोचतो तेव्हा त्याला जॅमर लावलेला असतो. यानंतर तो तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात करतो. "तुम्हाला गाडीवर काय लिहिलं आहे हे वाचता येत नाही का? गाडीला हात लावण्याची तुमची हिंमत झालीच कशी? जर तुम्ही तात्काळ जॅमर हटवला नाही तर मी तुम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जाईल. नंतरचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील," असं तरुण बोलत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.



यादरम्यान पोलीस कर्मचारी सतत तरुणाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोला असं सांगत असता. पण तरुण मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. जर माझी कार तात्काळ सोडली नाही, तर चार कानाखाली लगावेन. इथे मार खाणार की पोलीस ठाण्यात नेऊ मारु असंही तो विचारत असल्याचं ऐकू येत आहे.  


या व्हिडीओत तरुणासह त्याची आईही दिसत आहे. जवळपास अर्धा तास हा वाद सुरु होता. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आणि 1100 रुपये दंड भरायला लावून गाडी परत केली. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी कारवाई कऱणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं कौतुक करत आहेत.