लोणचं बनवण्याच्या टाकीत पडून बाप-लेकाचा मृत्यू
टाकीजवळ पसरलेल्या रसायनांमुळे दोघेही टाकीत पडले
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी लोणचं तयार करण्याच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील दौलत नगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी अनधिकृतपणे लोणचे तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्याचा मालक सकाळी त्याची पत्नी आणि मुलासोबत त्याठिकाणी आला होता.
या कारखान्यात भाज्यांवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी एक मोठी टाकी तयार करण्यात आली होती. वडील आणि मुलगा टाकीमध्ये पाहत असताना त्याठिकाणी पसरलेल्या रसायनांमुळे त्यांचा पाय घसरला आणि ते टाकीत पडले. हा प्रकार बघून मालकाच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी कारखान्यातील एक कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून आला. मात्र, मदत करण्याच्या नादात तो देखील टाकीत पडला. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला.
काही वेळापूर्वीच तिघांचेही मृतदेह टाकीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारखान्याला परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.