मध्यमवर्गीय तसंच सर्वसामान्य नागरिकांचं आपल्या काही वस्तूंवर जीवापेक्षा जास्त प्रेम असतं. अशीच एक गोष्टी म्हणजे कार. प्रत्येकजण आपल्या कारची अत्यंत काळजी घेत असतं. कारवर छोटासा ओरखडा जरी आला तरी कित्येकदा अनेकांना झोपही लागत नाही. पण गुजरातमधील एका व्यक्तीने आपलं कार प्रेम सिद्ध करताना हद्दच गाठली आहे. म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे तुम्ही कारला अखेरचा निरोप द्यायचा विचार कधी केला आहे का? नक्कीच नसेल. पण गुजरातमधील एका व्यक्तीने असंच केलं आहे. इतकंच नाही तर त्याने चक्क कारची अंत्ययात्रा काढली. यादरम्यान कारला फुलांनी सजवलं होतं. कारला अंतिम निरोप देण्यासाठी 2000 कार्ड छापून लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्याने कारचं वर्षश्राद्ध घालण्याचं आश्वासनही दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमदील पोलरा कुटुंबाचं आपल्या 18 वर्षं जुन्या कारवर इतकं प्रेम जडलं होतं की, त्यांनी तिला आपल्यासाठी 'लकी' मानलं होतं. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील पडरशिंगा गावातील संजय पोलरा आणि त्यांच्या कुटुंबाने गुरुवारी त्यांची लकी कार GJ05 CD7924 ला अंतिम निरोप दिला. पोलारा आणि त्यांच्या कुटुंबाने संपूर्ण गावातील आणि इतर लोकांना अंतिम निरोप देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. 


मंत्रोउच्चार पठण करत निरोप


पोलारा कुटुंबाने प्रमुख देवतेसमोर पुजाऱ्यामार्फत संस्कृत श्लोकांचे पठण करून विधी पूर्ण केले, त्यानंतर घरापासून त्यांच्या शेतातील 'समाधी' स्थळापर्यंत फुलांनी सजवलेल्या हॅचबॅक कारची मिरवणूक काढण्यात आली. कारची कबर मातीने झाकण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली.


2000 पाहुण्यांना आमंत्रण


कारला अंतिम निरोप देण्यासाठी 2000 लोकांना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं अशी माहिती कारचे मालक संजय पोलारा यांनी दिली. "आम्ही 2006 मध्ये शोरूममधून ही कार खरेदी केली तेव्हापासून ती आमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे. या कारने आपल्याला चांगलं नशीब आणि समृद्धी दिली आहे. समाजात आमची प्रतिष्ठा वाढली आहे. ही कार कायम आठवणीत राहावी अशी आमची इच्छा आहे".


झाडं लावण्याची इच्छा


आपल्या सिल्व्हर हॅचबॅकच्या स्मरणार्थ एक झाड लावायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'मला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून हा निरोप समारंभ करायचं ठरवलं. आम्ही दरवर्षी 7 नोव्हेंबरला या समाधीवर जमणार आहोत. यावेळी आपल्या आवडत्या कारमध्ये केलेले सर्व प्रवास आठवतील".