उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊमध्ये (Lucknow) एका घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचं एकामागोमाग निधन झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे. घरामध्ये फक्त आता वडील आणि पत्नी शिल्लक असून, महिलादेखील रुग्णालयात दाखल आहे. घरातील लहान मुलाचं निधन झाल्यानंतर शोकात बुडालेल्या पित्याने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यानंतर मोठ्या मुलाने विष पिऊन आपलं जीवन संपवलं. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊमधील त्रिवेणी नगरच्या मौसम बाग कॉलनीत ही घटना घडली आहे. येथे निवृत्त झालेले इंजिनिअर नागेंद्र प्रताप सिंग आपला मुलगा सूरज प्रताप सिंग, सून रुबी आणि दोन नातू श्रीकांत आणि कृष्णकांत यांच्यासह वास्तव्य करत होते. 


31 मार्च रोजी कृष्णकांत याचा ह्रद्यविकाराचा झटका आल्याने निधन झालं. मुलाच्या मत्यूमुळे धक्का बसलेले वडील सूरज प्रताप सिंग यांनी त्याच दिवशी आपल्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही शोकांतिका इथेच संपली नाही. दीड महिन्याने पुन्हा एकदा कुटुंबावर संकट कोसळलं. नागेंद्र यांच्या मोठ्या नातवाने विष पिऊन आपला जीवनप्रवास संपवला. 


दीड महिन्यात आपला पती आणि दोन्ही मुलांना गमवाल्यानंतर रुबी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मोठा मुलगा श्रीकांतही गेल्यानंतर त्या पूर्णपणे कोसळल्या होत्या. आपला एकुलता एक राहिलेला मुलगाही गमावल्यानंतर रुबी यांना दु:ख सहन झालं नाही. यादम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना मिडलँज रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 


आपला मुलगा आणि दोन्ही नातवांच्या निधनाने नागेंद्र प्रताप सिंह यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रूदेखील आता सुकले आहेत. सध्या ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. दरम्यान, कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. 


इंजिनिअरिंग केलेल्या श्रीकांत प्रताप सिंगची लॉकडाउनदरम्यान नोकरी गेली होती. याचदरम्यान, मार्च महिन्यात वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याने तो शोकात बुडाला होता. सोमवारी तो झोपण्यासाठी गेला तो परत उठलाच नाहीत. आई त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण तो काहीच बोलत नव्हता. शेजारी त्याला घेऊन रुग्णालयात गेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना ऐकून कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये असं लोक म्हणत आहेत.