नवविवाहित पत्नीसह राहू देईनात, वडील आणि बहिणीला कारने उडवलं; नंतर पत्नीसह कार नदीच्या दिशेने वेगात पळवली अन्...
दिल्लीत (Delhi) अमरोहा (Amroha) येथे राहणाऱ्या एका शिंप्याने आपली कार गंगा नदीत (Ganga River) बुडवली. यावेळी त्याची पत्नीही कारमध्ये बसलेली होती. 12 तासांच्या बचावकार्यानंतर पोलिसांनी शिंप्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पत्नीचा मृतदेह शोधला जात आहे.
दिल्लीत शिंपीकाम करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या शिंप्याने कारसह गंगा नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारमध्ये शाह आलम याच्यासह त्याची नवविवाहित पत्नी नाजियादेखील होती. घटनेची माहिती मिळताच अमरोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल 12 तासांच्या शोधकार्यानंतर शाह आलम याचा मृतदेह आढळला. दरम्यान, नाजियाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. गजरोला पोलीस ठाणे क्षेत्रातील सिकरी गावात ही घटना घडली आहे.
सिकरी गावात राहणाऱ्या शाह आलम याचा नुकताच नाजियासह निकाह झाला होता. शाह आलम दिल्लीत शिंपीकाम करत होता. नाजियाने आपल्यासह दिल्लीत येऊन राहावं अशी शाह आलमची इच्छा होती. पण त्याचे कुटुंबीय नाजियाला त्याच्याकडे पाठवण्यास तयार होत नव्हते. शनिवारी सकाळी याच मुद्द्यावरुन शाह आलमचं त्याच्या कुटुंबासह जोरदार भांडण झालं.
यानंतर शाह आलमने नाजियाला जबरदस्ती करत कारमध्ये बसवलं. कार सुरु करताच त्याचे वडील शाकीर कारसमोर येऊन उभे राहिले आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाह आलमने त्यांना कारनेच धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी शाह आमलची बहिणही कारसमोर आली. तिलाही शाह आलमने कारने धडक देत जखमी केलं आणि नंतर तेथून निघून गेला.
शाह आलम कार वेगाने पळवत होता. यादरम्यान एक दुचाकीस्वार कारच्या समोर आला असता त्याने त्याला धडक दिली आणि पुढे निघून गेला. यानंतर त्याने रस्त्यात अचानक कार वेगाने पळवली आणि थेट गंगा नदीत उडी मारली.
कार गंगा नदीत बुडत असल्याचं पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पती-पत्नीचा मृतदेह शोधण्यासाठी लगेच बचावकार्याला सुरुवात केली. तब्बल 12 तासांनी पोलिसांना शाह आलमचा मृतदेह सापडला. पण अद्याप नाजियाचा मृतदेह सापडलेला नाही. दुसरीकडे शाह आलमचे वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बहिणीला सौम्य जखमा झाल्या आहेत.