दिल्लीत बर्गर किंगमध्ये भयानक हत्याकांड; 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार, मैत्रीण मोबाईल, पाकिट घेऊन पळाली
पीडित अमन एका तरुणीसह बर्गर किंगमध्ये बसलेला होता. तरुणी त्याला आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवत होती. याचवेळी रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी आरोपींनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
दिल्लीत 26 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राजौरी गार्डन येथील बर्गर किंगमध्ये तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपींनी तब्बल 40 गोळ्या घालत तरुणाला संपवलं. अमन अशी पीडित तरुणाची ओळख पटली आहे. हा संपूर्ण हत्याकांड तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यात दिसत आहे त्यानुसार, अमन आपल्या मैत्रिणीसह बसला होता. यावेळी ती त्याला मोबाईलमधील फोटो दाखवत होती. याचवेळी मागे बसलेल्यांपैकी दोघे उठतात आणि पिस्तून काढून गोळ्या घालण्यास सुरुवात करतात.
गोळीबार सुरु झाल्यानंतर तिथे एकच धावपळ सुरु होते. यावेळी अमन बिलिंग काऊंटरच्या दिशेने धावत जातो. यानंतर दोघेजण त्याचा पाठलाग करतात आणि पॉईंट रेंजवरुन गोळ्या घालतात. एक शूटर काऊंटरला उभा राहून एकमागोमाग एक अनेक गोळ्या घालतो.
दुसरीकडे अमनसोबत बसलेली तरुणीही सगळा प्रकार पाहून घाबरते. यानंतर ती बर्गर किंगमधून पळून जाते. गोळीबार सुरु झाल्यानंतर एका मिनिटात संपूर्ण बर्गर किंग रिकामी होतं.
एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमनवर 38 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळीबार करताना वापरण्यात आलेली काडतुसं वेगवेगळी आहेत. यावरुन दोन शूटर्सनी वापरलेली शस्त्रं वेगळी असल्याचं दिसत आहे. दरम्यान बिलिंग काऊंटरच्या मागे अमनचा मृतदेह सापडला आहे. यावरुन त्याने गोळीबार सुरु झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत आहे. बर्गर किंगच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 25 ते 30 वर्षं वयोगटातील होते.
2020 मध्ये हरियाणात झालेल्या हत्येचा बदला घेण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून त्यामुळे राजधानीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अमनसोबत बसलेल्या तरुणीने त्याला बर्गर किंगमध्ये येण्यास भाग पाडल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात महिलेच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती अमनचा फोन आणि पाकीट घेऊन गायब झाली.
पोर्तुगाल कनेक्शन आलं समोर
फरार गँगस्टर हिमांशू भाऊ जो सध्या पोर्तुगालमध्ये असल्याचा संशय आहे, त्याने सोशल मीडियावरुन हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानेही पीटीआयशी बोलताना हाच संशय असल्याचं सांगितलं आहे. ‘आमचा भाऊ’ शक्तीदादाच्या हत्येत अमनचा हात होता आणि ‘हा सूड होता’ असं हिमांशूने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने हत्येत सहभागी इतरांनाही चेतावणी दिली असून लवकरच त्यांची पाळी येईल असा इशारा दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, हिमांशू भाऊ, ज्याची टोळी दिल्ली आणि हरियाणामध्ये कार्यरत आहे, तो खंडणीसाठी कुख्यात आहे. तुरुंगात असलेला गुंड नीरज बवाना याचा साथीदार भाऊ 2022 मध्ये देश सोडून पळून गेला होता.