Covid JN.1 Cases in India: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये ही कोरोनाचा सब-व्हेरिएंट JN.1 चे रूग्ण आढळून आल्याने चिंता अजून वाढलीये. राजस्थानमध्ये चार रूग्णांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार, JN.1 च्या सब व्हेरिएंटचे आता 66 रूग्ण असल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. 


दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगची नोंद करण्यात आली आहे, ज्यामध्ये एका नमुन्यात सब-व्हेरियंट जेएन-1 च्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. इतर दोन नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनच्या जुन्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आलाय. राजस्थानच्या अजमेर, दौसा, झुंझुनू आणि भरतपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक नवीन प्रकार आढळून आलाय. यापैकी दौसा रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


गोव्यात JN.1 चे सर्वाधिक रूग्ण


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोविडमधून 293 रुग्ण बरे झाले आहेत. 66 नवीन प्रकरणे समोर आली असून कोविड सब-व्हेरियंट JN.1 चे 109 रुग्ण आहेत. सब व्हेरिएंट JN.1 ची सर्वाधिक प्रकरणं गोव्यात नोंदवण्यात आली आहेत. या व्हेरिएंटचे रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये देखील सापडले आहेत. 


गेल्या 24 तासांत 500 हून अधिक रूग्णांची नोंद


भारतात गेल्या 24 तासात करोनाच्या 529 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. आता देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4093 झालीये. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासात कोरोनाच्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन रुग्ण कर्नाटक आणि एक रुग्ण गुजरातचा आहे. यादरम्यान कोरोनाचा सब व्हेरिएंट जेएन.1 च्या 40 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली. 


महाराष्ट्रात टास्क फोर्स पुन्हा स्थापन


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले असून या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आलंय. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्क फोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे.