सोफ्यावर बापाचा मृतदेह, 8 वर्षाच्या मुलाला फ्रीजमध्ये लपवलं; अन् मुलीच्या मोबाईलवर आलेला `तो` मेसेज
Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ माजली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून, घऱात फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. दुसरीकडे मुलगी बेपत्ता आहे.
Crime News: मध्य प्रदेशात दुहेरी हत्येमुळे खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील मिलेनियम कॉलनीमध्ये राहणारा रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर मृतदेह सोफ्यावर ठेवला होता. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यात घरातील 14 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. मुलीच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना हत्या करण्यात आल्याची माहिती देणारा वॉईस मेसेज पाठवण्यात आला. यानंतर हा सगळा खुलासा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव राजकुमार विश्वकर्मा आहे. ते सिविल लाइन्स येथील मिलेनियम कॉलनीत आपला 14 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षाच्या मुलीसह वास्तव्यास होते. मे 2023 मध्ये आजारपणामुळे त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. राजकुमार विश्वकर्मा रेल्वेत कार्यालय अधिक्षक होते.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात राजकुमार यांनी शेजारी राहणारा मुकूल सिंग याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुकूलला अटक केली होती. काही दिवसांपूर्वी मुकूल जामीनावर बाहेर आला होता. राजकुमार आणि त्यांच्या मुलाची हत्या झाल्यापासून मुकूल बेपत्ता आहे.
राजकुमार यांच्या भावाच्या मुलीच्या मोबाईल एक वॉईस मेसेज आला होता. यामध्ये राजकुमार यांची मुलगी आर्याने सांगितलं होतं की, मुकूलने तिचे वडील आणि भावाला ठार केलं आहे. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. एसपी आदित्य प्रताप सिंग यांनी घटनास्थळ गाठलं. पोलीस दरवाजा तोडून घऱात पोहोचले असता, राजकुमार यांचा मृतदेह सोफ्यावर पडला होता. तर मुलाला फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण त्यांची मुलगी अद्याप बेपत्ता आहेत.
या हत्याकांडामुळे पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. पोलीस राजकुमार विश्वकर्मा यांची बेपत्ता मुलगी आणि मुकूल सिंग यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर एफएसएल टीम, पोलीस अधिकारी आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले होते. मुकूलने घऱात घुसून राजकुमार आणि त्यांच्या मुलाची हत्या केली असा प्राथमिक अंदाज आहे.
पण मुलीच्या मोबाईलवरुन मेसेज आल्याने पोलीस थोडेसे गोंधळात आहेत. तिने आरोपी मुकूलच्या नकळत मेसेज पाठवला असावा असा संशय आहे. तसंच मुकूल तिला जबरदस्ती सोबत घेऊन गेला असावा असाही अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.