मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत दाखल झाले. केंद्रातील भाजप सरकारला राम मंदिर उभारणीच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी उद्धव दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह ते विशेष विमानाने फैजाबाद विमानतळावर उतरले. मात्र, यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. उद्धव ठाकरे यांनी फैजाबादला येण्यासाठी रिलायन्सचे चार्टर्ड विमान वापरले, असा दावा दमानिया यांनी केला. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना या आरोपाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देते, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, फैजाबाद विमानतळावरून उद्धव ठाकरे थेट लक्ष्मण किलाकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे येणार असल्याने लक्ष्मण किलावर रामभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' अशा घोषणा दिल्या जात आहेत. यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येतील साधू-महंतांच्या भेटीगाठी घेतील. 



 
कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात 


दोन दिवसांत अयोध्येत कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून केंद्रीय राखीव पोलीस, राज्य पोलीस आणि अन्य निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वादग्रस्त रामजन्मीभूमीच्या विद्यमान स्थितीत कोणीही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तात्काळ रोखण्यात यावे, असे आदेश सुरक्षा दलांना सरकारकडून देण्यात आले आहेत.