उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील निवासी व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. जोडप्याने हरिद्वारमध्ये गंगेत उडी मारुन आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी कर्जाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पाठीमागे दोन मुलं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहारनपूरमध्ये राहणाऱ्या या व्यापाऱ्याचं नाव सौरभ बब्बर असं आहे, तसंच त्यांच्या पत्नीचं नाव मोना बब्बर आहे. दोघेही बाईकवरुन प्रवास करत 100 किमी अतंर पार करुन हरिद्वारमध्ये पोहोचले आणि नंतर अखेरचा सेल्फी घेत सुसाईड नोटसह तो व्हॉट्सअपवर मित्राला पाठवला. यानंतर दोघांनी गंगेत उडी मारली. सौरभचा मृतदेह हाती लागला आहे, मात्र मोना यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ यांच्यावर करोडोंचं कर्ज झालं होतं. व्याजाचे हफ्ते भरु ते हैराण झाले होते. याचमुळे अखेर त्यांनी हरिद्वारमध्ये गंगेत उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. सुसाईट नोटमध्ये सौरभने लिहिलं आहे की, "आपण कर्जात बुडालो होतो. व्याज भरुन भरुन आपण त्रासलो होतो. यामुळेच आपण मृत्यूला कवटाळून घेत आहोत. जिथे आत्महत्या करुन तिथे सेल्फी काढून पाठवू". 


नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मोठी मुलगी 12 चर लहान मुलगा 7 वर्षांचा आहे. मुलगा पायाने अपंग आहे. सौरभ यांचं किशनुपरा मार्केटमध्ये दागिन्यांचं दुकान आहे. तसंच कमेटी सिस्टम (हफ्त्यांवर उधारी) चालवत होते. सौरभ यांनी 5 कमेटी सुरु केल्या आहेत. एका कमेटीत 200 सदस्य होते आणि एका सदस्याचा 2000 चा हफ्ता होता. सर्व समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सर्वांना पैसे द्यावे लागणार होते.


आत्महत्येआधी कुटुंबीयांना फोन


एकीकडे व्यवसायात नुकसान होत होतं तर दुसरीकडे समिती सदस्यांना पैसे द्यावे लागत होते. पण सौरभकडे पैसे नव्हते. कर्जबुडवे त्याला त्रास देऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून सौरभने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीला बाईकवर घेऊन ते सहारनपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिद्वारला पोहोचले आणि तिथे गंगेत उडी मारली. उडी मारण्यापूर्वी त्याने आपल्या घरी शेवटचा कॉल केला होता, त्याचे रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सौरभ बब्बरने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, "मी, सौरभ बब्बर, कर्जाच्या दलदलीत इतका अडकलो आहे की बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नाही. शेवटी मी आणि माझी पत्नी मोना बब्बर आमचे जीवन संपवत आहोत. किशनपुरा येथील आमची मालमत्ता दोन्ही मुलांसाठी आहे. आमची मुले त्यांच्या आजीच्या घरी राहतील. आम्ही आमचं जीवन त्यांच्या हवाली करत आहोत. आम्हाला इतर कोणावर विश्वास नाही. जेव्हा आत्महत्या करु तेव्हा व्हॉट्सअपला फोटो शेअर करु".


हरिद्वारजवळील गंगा पुलावर उभं राहून सौरभने पत्नीसोबतचा फोटो क्लिक केला आणि नंतर तो त्याच्या मित्राच्या व्हॉट्सॲपवर सुसाईड नोटसह पाठवला. शेवटी पती-पत्नी दोघांनीही पुलावरून गंगेत उडी घेतली.


व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट आणि फोटो मिळताच मित्राने सौरभ बब्बरच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर सौरभ आणि मोनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर हरिद्वारच्या राणीपूर कोतवाली भागातील गंगा कालव्यातून सौरभचा मृतदेह सापडला. सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली आहे. मात्र पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.