Crime News: 'आश्रम' वेब सीरिज (Ashram Web Series) पाहिल्यानंतर अनेक संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. पंजाबमधील वादग्रस्त गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याच्याशी साम्य असणाऱ्या या वेब सीरिजमधील अनेक गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला होता. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणारा बॉबी देओल महिला भक्तांवर बलात्कार करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात अशीच घटना घडली आहे. आपल्याच आश्रमात एका 15 वर्षांच्या अनाथ मुलीवर महिनोमहिने बलात्कार करणाऱ्या एका साधूला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशात एका साधूने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आपल्याच आश्रमात गेले अनेक महिने हा साधू मुलीवर बलात्कार करत तिचं लैंगिक शोषण करत होता. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे विशाखापट्टणमच्या वेंकोजी येथील ज्ञानानंद आश्रमाचे प्रशासक पूर्णानंद सरस्वतीला विजयवाडा येथून अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णानंद सरस्वतीने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले तसंच तिचा धमकावलं अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. अखेर मुलगी आश्रमातून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. यानंतर तिने थेट विजयवाडा गाठलं आणि पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. 


पीडित मुलगी लहान असतानात तिच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. तिच्या आजीने दोन वर्षांपूर्वी मुलीला आश्रमात सोडलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. "पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतलं असून तपास सुरु केला आहे. पूर्णानंद सरस्वतीला ताब्यात घेण्यात आलं असून तपास सुरु आहे," अशी माहिती पोलीस अधिकारी विवेकानंद यांनी दिली आहे.


"पूर्णानंद सरस्वतीवर आश्रमातच अल्पवयीन मुलीवर गेले अनेक महिने बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीचे आई-वडील किंवा इतर कोणीही नसल्याचा फायदा त्याने घेतला. भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच न्यायालयीन कोठडीत पाठवले जाईल," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.