तिरुमला : काही दिवसांपूर्वीच केरळमधील शबरीमला  Kerala Sabarimala  मंदिराचे द्वार मंडलाकला पर्वासाठी सुरु करण्यात आले. ज्यानंतर पुढी जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. मंदिराचे द्वार खुले होण्यापूर्वीच देशातून अनेक ठिकाणांवरील यात्रेकरुंनी शबरीमला यात्रेची वाट धरली. काही टप्प्यांमध्ये होणाऱ्या या यात्रेचा प्रवास करणाऱ्या अशाच काही यात्रेकरुंना वाटेत एका खास यात्रेकरुची साथ लाभली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ ऑक्टोबरला आंध्रप्रदेशमधील तिरुमला येथून १३ यात्रेकरुंनी खडतर अशा या प्रवासाची सुरुवात केली. तेव्हापासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आता चिकमंगलुरू जिल्ह्यातील कोट्टीगेहरापर्यंत पोहोचला आहे. मुख्य म्हणजे या १३ भाविक यात्रेकरुंसोबत आतापर्यंत जवळपास ४८० किलोमीटर इतक्या अंताराचा प्रवास एका श्वानानेही पूर्ण केला आहे. 


'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये यात्रेकरुंसोबत चालणारा श्वान  पाहायला मिळत आहे. यात्रेला निघालेल्यांमध्ये असणाऱ्या या खास मंडळींच्या जेव्हा ही बाब लक्षात आली, तेव्हा त्यांच्यासाठीसुद्धा हे सारंकाही अनपेक्षित आणि भारावणारं होतं. 



'प्रथमत: त्या श्वानाकडे आमचं लक्ष गेलं नाही. पण, जसजसे आम्ही पुढे जात होतो, तसतसा तो आमच्या मागे-मागे येत होता. आमच्यासाठीच तयार केलेलं जेवण आम्ही त्याला दिलं', असं सांगत एका यात्रेकरुने या नव्या साथीदाराविषयी सांगितलं. यात्रेसाठी आपण दरवर्षी जातो, पण असा अनुभव हा पहिल्यांदाच येत असल्याचंही ते म्हणाले. देवस्थानाच्या दिशेने निघालेल्या या श्रद्धाळूंना मिळालेली ही साथ त्यांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने खास करत आहे हे खरं. 



दरम्यान, केरळमधील शबरीमला मंदिर परिसरात यात्रेच्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरात महिलांच्या प्रवेशाला मंदिर प्रशासन आणि  धार्मिक संस्थांकडून असणारा विरोध पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वतोपरी काळजीही घेण्यात येत आहे.