`प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते`, Facebook वर प्रेयसीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्याने घेतला गळफास, खिशात सापडली सुसाईड नोट
Crime News: बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या राहुल यादव याने राहत्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. कुटुंबाला घरात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. राहुल यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. तसंच त्याने मृत्यूच्या 8 तास आधी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहिली होती.
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात बी.फार्माचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे (Suicide) खळबळ माजली आहे. राहुल यादव या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. कुटुंबाला घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ माजली आहे. तरुणाच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे. तसंच आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या प्रेयसीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मोहब्बतपूर पइसा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कैमा गावात ही घटना घडली आहे. गावात राहणारे छोटेलाल यादव हे शेतकरी आहेत. छोटेलाल यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा दिल्लीत खासगी नोकरी करतो. मुलीचं लग्न एका वर्षापूर्वी झालं आहे. सर्वात छोटा मुलगा राहुल यादव 22 वर्षीय असून कॉलेजमध्ये शिकत आहे. राहुल यादव बी.फार्माच्या फायनल सेमिस्टर परीक्षेची तयारी करत होता.
कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यादव कोविड काळात सामुदायिक आरोग्य केंद्र सिरथू अंतर्गत कोविड ऑपरेटर (कंत्राटी) म्हणून काम करत होता. यादरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. जवळपास तीन वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
यादरम्यान शनिवारी सकाळी अचानाक कुटुंबियांना राहुलचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यावेळी त्याच्या पँटच्या खिशात सुसाईड नोट सापडली. मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबात एकच खळबळ माजली होती. यादरम्यान, कुटुंबातील एका सदस्याने त्याने 8 तासांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केल्याची माहिती दिली. यामध्ये त्याने आत्महत्येसाठी आपल्या प्रेयसीला जबाबदार धरलं होतं.
राहुलने आत्महत्येआधी फेसबुकवर आपल्या प्रेयसीसह फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझं आयुष्य हिनेच खराब केलं आहे". सुसाइड नोटमध्ये राहुलने लिहिलं आहे की, "आपण हतबल होऊन आत्महत्या करत आहोत. मला लग्नाचं आश्वासन देऊन माझ्यासह तिने 6 महिने संबंध ठेवले आणि आता मला तुझ्याशी काही देणंघेणं नाही, जाऊन मर हवं तर असं म्हणत आहे. अनेक महिन्यांपासून माझ्यावर ती मानसिक अत्याचार करत असून आता सहन होत नाही. हिने माझं आयुष्य खऱाब केलं आहे. तिला कडक शिक्षा झाली पाहिजे. तिने माझं कुटुंब संपवलं आहे. प्रत्येक वेळी चूक मुलाची नसते. आता सर्व काही माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलं आहे".
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.